Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयेमुळे बाजारपेठांना पुन्हा झळाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshaya Tritiya

Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयेमुळे बाजारपेठांना पुन्हा झळाळी

पुणे : कोरोनामुळे थंडावलेली शहरातील विविध बाजारपेठांमधील आर्थिक उलाढाल आता पुन्हा जोर धरू लागली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारपेठेला पुन्हा अच्छे दिन आले आहेत. त्यानंतर मंगळवारी (ता. ३) असलेल्या अक्षय्य तृतीयेमुळे बाजारपेठांना पुन्हा झळाळी आली आहे. पूर्णतः अनलॉक झाल्यानंतरचा हा दुसरा महत्त्वाचा सण आहे. त्यामुळे या निमित्ताने व्यवसायातील उलाढाल वाढण्यासाठी व्यावसायिक देखील सज्ज झाले आहे. अनेक दिवसांनी पूर्णतः खुली झालेली बाजारपेठ, लग्नसरार्इ आणि वाढलेले सर्वच प्रकारचे कार्यक्रम यामुळे खरेदीस नागरिकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे.

हा ट्रेंड कायम ठेवण्यासाठी व्यावसायिकांनी अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने अनेक आॅफर देखील सुरू केल्या आहेत. त्याचा फायदा नागरिकांना घेता येणार आहे. गेल्या महिन्यापासून सोन्याचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. नागरिकांची स्वतःच्या घराला असलेली मागणी वाढल्याने बांधकाम व्यवसाय, विविध आॅफर आणि मागणी असल्याने इलेक्ट्रॉनिक मार्केट, लग्न सरार्इमुळे कापडबाजार आणि गृहोपयोगी वस्तूंची मागणी वाढली आहे.

सराफ बाजाराला झळाळी

साडेतील मुर्हुतांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली होती. तोच ट्रेंड आता देखील कायम राहण्याचा विश्‍वास व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. कारण आता लग्नसरार्इ मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. त्यामुळे मंगळवारी (ता. ३) सराफ बाजाराला झळाळी येणार आहे.

लग्नसरार्इमुळे खरेदी वाढली

लग्न व त्याबाबत विविध कार्यक्रम करण्यासाठी सध्या कोणतीही बंधने नाहीत. त्यामुळे लग्नसरार्इ देखील आता जोरात सुरू झाली आहे. या उत्साहामुळे लग्नासाठी आवश्‍यक असलेले कपडे, भांडे, विविध प्रकारच्या वस्तू आणि इतर आवश्‍यक बाबींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे २०१९ व त्यापूर्वी विविध पेठांमध्ये जशी गर्दी होत होती तशी गर्दी आता पुन्हा होवू लागली आहे.

घराची स्वप्नपूर्ती करता येणार

बांधकामासाठी आवश्‍यक असलेल्या साहित्याच्या किमती वाढल्याने वास्तूची किंमत ५०० ते एक हजार रुपये प्रति चौरस फुटाने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही दरवाढ होण्यापूर्वीच आपण घर बुक करावे, असे नियोजन अनेकांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दिवशी केले आहे. नागरिकांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी विकसकांनी देखील अनेक आॅफर देखील दिल्या आहेत. त्यामुळे घर खरेदीसाठी मुहूर्त देखील साधता येणार आहे.

गृहोपयोगी व इलेक्ट्रॉनिक वस्तूंना अच्छे दिन

लग्न सरार्इने जोर धरल्याने आता गृहोपयोगी वस्तूंची मागणी देखील वाढली आहे. त्यामुळे कापड मार्केटसह गृहोपयोगी वस्तूंच्या बाजारपेठा देखील बहरल्या आहेत. हीत स्थिती इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्याबाबतीत आहे. लॅपटॉप, लॅपटॉप स्पेअरपार्ट व आॅफीस व घरून काम करण्यासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तुंची मागणी मोठी आहे. त्यासह साऊंट, कॅमेरा, कॅमेरा स्टॅन्ड, चार्जर, मोबार्इल, ब्लूटूथ हेडफोन अशा वस्तूंना देखील ग्राहकांची पसंती मिळत आहे.

अक्षय्य तृतीया हा सण प्रत्यक्ष बाहेर पडून साजरा करण्याची संधी आपल्याला तब्बल दोन वर्षांनी मिळत आहे. केवळ सराफी व्यावसायिक नव्हे तर सर्व ग्राहकही यंदाच्या अक्षय्य तृतीयेची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. २०१९ साली देशात अक्षय तृतीयेला अंदाजे १८ टन सोन्याची विक्री झाली होती. यंदा हा आकडा २० टनांच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे. रशिया व युक्रेन यांच्यातील युद्ध संपल्यानंतर सोन्याच्या किमतींमध्ये परिणाम होण्याची भीती आता कमी झाली आहे. सोन्याचे भाव सातत्याने वाढत राहतील अशी अपेक्षा आहे. गेल्या दोन वर्षात ऑनलाइन सोने खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली होती. परंतु यावेळी, आम्हाला विश्वास आहे की आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर योग्य दागिने शोधणे आणि निवडीसाठी अधिक केला जाईल आणि प्रत्यक्ष खरेदी दालनांमध्ये होईल.

- डॉ. सौरभ गाडगीळ, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स

Web Title: Many Offers On Occasion Of Akshaya Tritiya Market Trend Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top