मुळशी तालुक्यात अनेक जण मतदानापासून वंचित

बंडू दातीर
Tuesday, 1 December 2020

शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत मतदार यादीतील घोळांमुळे मुळशी तालुक्यात अनेकांना मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली.

पौड :  तथापि पदवीधरांपेक्षा शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेत मतदानाचा टक्का वाढविला. प्रथमच प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणूकीत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींही केंद्रांवर ठाण मांडून होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तालुक्यात पौड, लवळे, घोटवडे आणि मुठा याठिकाणी मतदान केंद्रे होती. यावेळी निवडणूकीच्या कामातून ऐनवेळी शिक्षकांना वगळण्यात आल्याने मतदान करून शिक्षकांनी नैमित्तिक सुट्टीचा लाभ उठविला. सकाळच्या पहील्या चार तासातच शिक्षकांचे सरासरी पन्नास टक्के मतदान झाले होते. दुचाकी, चारचाकी घेवून शिक्षकांनी एकत्रित येत मतदान केले. एका मतदाराची मतदानाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान एक ते दोन मिनीट लागत होते. त्यामुळे पौड, लवळे या केंद्रांवर मतदारांच्या काही काळ रांगा लागल्या होत्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभाग, पौड पोलिस आणि आरोग्य पथकाने चोख पूर्वतयारी केली होती. प्रत्येक मतदारांची थर्मल तपासणी केली जात होती. सॅनिटायझर घेत तोंडावर मास्क घालत सोशल डिस्टन्स पाळून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

तथापि शिक्षक आणि पदवीधर मतदार यादीतील मोठा घोळ यावेळी समोर आला. पुणे, पिंपरी चिंचवड आणि उपनगरात राहणाऱ्या बऱ्याचशा मतदारांची नावे तालुक्यातील केंद्रांमध्ये समाविष्ट झाली होती. तसेच पौड परिसरात राहणाऱ्या मतदाराचे नाव लवळे किंवा घोटवडे केंद्रात लागले होते. तर अगदी हाकेच्या अंतरावर केंद्र असलेल्या मुठा, कोंढूर, आंदगावच्या शिक्षकांना पौडला येण्याची वेळ आली. तथापि घोटवडे केंद्रात केवळ दोन शिक्षकांसाठी एक केंद्र होते. तर लवळ्यात मात्र हाच आकडा 474 असल्याने येथे मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांवर मोठा ताण आला होता. दोन मतदान करणाऱ्या शिक्षकांना पदवीधरसाठी एका केंद्रावर तर शिक्षक मतदानासाठी दुसऱ्या केंद्रावर जावे लागले.

पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी

तालुक्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनीधींनी दिवसभर मतदान केंद्रांना भेट देत मतदानाचा आढावा घेतला. पौड केंद्रात भाजपाने बुथही लावला होता.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many people in Mulshi taluka are deprived of voting