‘मॅप्रो स्कूलिंपिक्‍स’ची नोंदणी आजपासून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

नावनोंदणीविषयी...
संकेतस्थळ - www.schoolympics.com 
यूआरएल - schoolympics-pranav.eaariacloud.com 
केंद्र - ‘सकाळ’च्या बुधवार पेठ येथील कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत. (सोमवार ते शनिवार)
संपर्क - पुणे - ८४८४०६९७६८, पिंपरी चिंचवड - ८४८४०६९७६४ 
ई-मेल - schoolympics.pune@whitecopper.com

पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘मॅप्रो स्कूलिंपिक्‍स’ या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेच्या नोंदणी प्रक्रियेस गुरुवार (ता. १)पासून सुरवात होत आहे. यंदा शाळांची नोंदणी प्रक्रिया ‘ऑनलाइन’ पद्धतीने होणार आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळा आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना आपले क्रीडाकौशल्य दाखवण्याची संधी यातून मिळणार आहे.

पुण्यामध्ये ‘स्कूलिंपिक्‍स’ स्पर्धा २०१४, १६, १७ आणि १८ मध्ये झाली होती. यंदा पाचवा हंगाम असून स्पर्धेचा हा थरार नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये रंगणार आहे. शाळांनी ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेसाठी www.schoolympics.com या संकेतस्थळावर भेट द्या किंवा schoolympics-pranav.eaariacloud.com या ‘यूआरएल’वर क्‍लिक करा. गेल्या वर्षी या स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळांनी यंदा नोंदणीसाठी हेल्पलाइन क्रमांकावर फोन करणे आवश्‍यक आहे. त्यानंतर अशा शाळांना स्पर्धेसाठीचा ‘लॉग-इन आयडी’ आणि ‘पासवर्ड’ देण्यात येईल. त्यानंतरच या शाळा यंदाची नोंदणी प्रक्रिया सुरू करू शकतील. स्पर्धेत सहभागासाठी जुन्या आणि नवीन शाळांना १० ऑगस्टपूर्वी आपली प्राथमिक नोंदणी पूर्ण करणे आवश्‍यक आहे. स्पर्धेची संपूर्ण नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट आहे. ही स्पर्धा २२ क्रीडा प्रकारांत आयोजिली जाणार असून, यामध्ये सात सांघिक आणि १५ वैयक्तिक क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. सांघिक गटातील स्पर्धा १० ते १६ वयोगटातील मुले आणि मुलींसाठी असतील. वैयक्तिक क्रीडा प्रकारांसाठी १० ते १२, १२ ते १४ आणि १४ ते १६ असे तीन वयोगट असणार आहेत. 

सांघिक क्रीडा प्रकारांत बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल या स्पर्धांचा समावेश असून बॅडमिंटन, बॉक्‍सिंग, जिम्नॅस्टिक्‍स, ज्यूदो, तायक्वांदो, ॲथलेटिक्‍स, स्केटिंग, टेनिस, स्वीमिंग, टेबल टेनिस, कुस्ती, नेमबाजी, धनुर्विद्या, बुद्धिबळ आणि सायकलिंग अशा वैयक्तिक क्रीडा प्रकारांतील ४२६ हून अधिक स्पर्धांच्या फेऱ्या होणार आहेत. या स्पर्धांतून २३५९ पदके (७३१ सुवर्ण, ७३१ रजत आणि ८९७ कांस्य) पटकावण्याची संधी स्पर्धकांना असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mapro Schoolympics registration Start Interschool Sports Competition