मराठा समाज पेटून उठला ना तर तुझ्याकडे खाजवायला जागा शिल्लक राहणार नाही - अंबादास दानवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ambadas Danave

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या अवमानकारक विधानाचा मी निषेध केला आहे. मराठा समाज व इतर कोणत्याही समाजाचा अवमान करणे चुकीचे आहे.

मराठा समाज पेटून उठला ना तर तुझ्याकडे खाजवायला जागा शिल्लक राहणार नाही - अंबादास दानवे

नारायणगाव - आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या अवमानकारक विधानाचा मी निषेध केला आहे. मराठा समाज व इतर कोणत्याही समाजाचा अवमान करणे चुकीचे आहे. मराठा समाज पेटून उठला ना तर तुझ्याकडे खाजवायला एक जागा सुद्धा शिल्लक राहणार नाही. असा इशारा या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. आज दुपारी येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा मेळावा झाला. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटे, तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी माजी आमदार बाळासाहेब दांगट, दिलीप बामणे, सरपंच योगेश पाटे, बाळासाहेब पाटे, राम गावडे, उपजिल्हा प्रमुख संभाजी तांबे, माजी नगराध्यक्ष सुनील मेहेर, जयवंत घोडके, दिलीप डुंबरे, रशीद इनामदार, चंद्रकांत डोके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते दानवे म्हणाले सत्तेसाठी कोल्हे, कुत्रे, लांडगे एकत्र आले आहेत. शिवसेनेतील धनदांडगे गेले मात्र सर्वसामान्य शिवसैनिक जाग्यावरच आहे. आत्मविश्वासाने संघटनात्मक काम करा.लढण्याचा निर्धार करा. आगामी निवडणुकीत क्रांती होईल. असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले मंत्री अब्दुल सत्तार म्हणतात, मी कुत्रा निशाणी घेऊन निवडणूक लढवली तरी निवडून येईल. लोक म्हणतात या कुत्र्याला मतदान करायचं का? कुत्रा तरी प्रामाणिक असतो. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा दानवे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, क्रांती मोर्चा व मराठा समाज सातत्याने आरक्षणाची मागणी करत आहे. आता तुमचे सरकार आले आहे. मराठ्यांना तुम्ही आरक्षण दिले पाहिजे. मराठा समाज व इतर कोणत्याही समाजाचा अवमान करणे चुकीचे आहे.

मराठा समाज पेटून उठला ना तर तुझ्याकडे खाजवायला एक जागा सुद्धा शिल्लक राहणार नाही. असा इशारा त्यांनी या वेळी आरोग्य मंत्री सावंत यांना दिला. विरोधी पक्षनेते दानवे पुढे म्हणाले केंद्राशासनाचे व राज्य शासनाचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष नाही. शेतमालाला हमी मिळणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक नेते आहेत असा भास निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. कृषी मध्ये प्रगत असलेल्या पुणे जिल्ह्यात शेतकरी पंतप्रधान यांच्या नांवे चिठ्ठी लिहून आत्महत्या करतो हे लाजिरवाणी आहे. शिंदे - फडणवीस सरकारच्या कालावधीत एक जुलैपासून राज्यात ३७५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र नुकसान भरपाई मिळाली नाही.

नुकसान भरपाई मिळाली असती तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या टळल्या असत्या. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रूपयांचेअनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही. चाळीस आमदारांनी गद्दारी केली काही फरक पडत नाही. सर्वसामान्य शिवसैनिक जाग्यावरच आहे. संघटनात्मक बांधणी करा. राज्यात क्रांती होईल. प्रस्ताविक तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी केले. आभार सरपंच योगेश पाटे यांनी मानले.