
पुणे : छत्रपती संभाजी महाराजांच्या पश्चात औरंगजेबाच्या मोगल फौजेने राजधानी रायगड, राजगड, पुरंदर आणि सिंहगडासारखे स्वराज्यातले महत्त्वाचे किल्ले जिंकून घेतले होते. अशा संकटसमयी छत्रपती राजाराम महाराजांना स्वराज्यापासून शेकडो मैलावरील दक्षिणेतील जिंजीच्या किल्ल्यावर आश्रयाला जावे लागले होते. अशा विपरीत परिस्थितीत पदाती सप्तसहश्री सरदार नावजी बलकवडे यांनी पराक्रमाची शर्थ करून लोहगड, कोरीगड व सिंहगड हे किल्ले जिंकून पुन्हा स्वराज्यात आणले. तसेच जंजिरेकर सिद्दीचा कुर्डुघाटात आणि मुघल सरदार मन्सूरखान बेग याचा पौड खोऱ्यातील जांभुळने येथे दारुण पराभव केला व स्वराज्याची मोठी सेवा केली.