मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 December 2020

राज्य सरकारने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण आणि नोकरी प्रवेश प्रक्रियेत डावलून इतरांसाठी प्रक्रिया सुरु केल्याप्रकरणी मराठा समाज अस्वस्थ आहे.

पुणे : महावितरणमध्ये विशेष आर्थिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) आरक्षणांतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना वगळून इतर भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरतीसाठी होत असलेली पडताळणी प्रक्रिया मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाच्या माध्यमातून बुधवारी (ता.२) उधळून लावली. 

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने रास्ता पेठेतील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेले उमेदवार, त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे, रघुनाथ चित्रे पाटील, विकास पासलकर, राजेंद्र कुंजीर, बाळासाहेब आमराळे, तुषार काकडे, युवराज दिसले, अमर पवार, किशोर मोरे, सचिन आडेकर, श्रृतिका पाडळे, सचिन पवार, अश्‍विनी खाडे, महेश यादव, अनिल मारणे आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. 

पुणे पदवीधर मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; जादुई आकडा गाठण्यासाठी चुरस​

राज्य सरकारने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण आणि नोकरी प्रवेश प्रक्रियेत डावलून इतरांसाठी प्रक्रिया सुरु केल्याप्रकरणी मराठा समाज अस्वस्थ आहे. महावितरणने भरतीमध्ये मराठा एसईबीसी आरक्षणांतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना समाविष्ट केलेले नाही. सरकारने आश्वासन न पाळल्यामुळे भरती करू नये, सरकारच्या पुढील आदेशापर्यंत एसईबीसी आरक्षणांतर्गत अर्ज असलेल्या उमदेवारांची त्वरीत करावी, अशी मागणी क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली. या प्रसंगी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार आणि अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत यांना निवेदन देण्यात आले. 

कुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू​

या संदर्भात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक चित्रे पाटील म्हणाले, महावितरण उपकेंद्र सहायक पदासाठी सरकारने 28 जून रोजी यादी प्रसिद्ध केली. त्याच वेळी कागदपत्रांची पडताळणी आणि नियुक्‍त्या होणे अपेक्षित होते. मात्र, एसईबीसी विद्यार्थ्यांना वगळून 2 डिसेंबर रोजी शटर बंद करुन पडताळणी चालू होती. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ही पडताळणी बंद पाडण्यात आली आहे.

पासलकर म्हणाले, सरकारने महावितरणमध्ये भरती करताना सर्व प्रक्रिया पूर्ण केलेल्या एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना डावलून पडताळणी प्रक्रिया सुरु ठेवली आहे. ही प्रक्रिया शटर बंद करुन केली जात असून, या घटनेचा आणि सरकारचा मराठा क्रांती मोर्चा निषेध करीत आहे. सरकारने त्वरीत सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय देऊन ही भरती प्रक्रिया एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसह पूर्ण करावी.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha staged agitation against recruitment process in MSEDCL except SEBC