
बीडमधील पाटोद्याजवळील पथारी या छोट्याशा गावातील एका शेतकरी कुटुंबात राहुल आवारे यांचा जन्म झाला. वडील बाळासाहेब आवारे हेही राज्यपातळीवरील कुस्तीपटू, शेतकरी.
पुणे : बीडमधील पाटोद्याजवळील एका छोट्याशा खेड्यातून पुण्यात येऊन राहुल आवारे या पहिलवानाने कुस्तीचे धडे गिरविले, कष्टाच्या जोरावर राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण, जागतिक स्पर्धेत कांस्य, त्यापाठोपाठ आशियाई स्पर्धेत कांस्य, रौप्य पदक पटकाविले. या कष्टाचे फळ अर्जुन पुरस्काराद्वारे प्राप्त झाले. कुस्तीच्या मैदानात विरोधी मल्लाला 'धोबीपछाड' करणारे, आता हेच राहुल आवारे गुरूवारी पुणे ग्रामीण पोलिस दलात 'डीवायएपी' म्हणून रुजू होत असून ते लवकरच गुन्हेगारांनाही 'चितपट' करण्याची शक्यता आहे.
- पुणे नाही, तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आमदार; चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला!
अशी आहे, राहुल आवारेंची पार्श्वभूमी
बीडमधील पाटोद्याजवळील पथारी या छोट्याशा गावातील एका शेतकरी कुटुंबात राहुल आवारे यांचा जन्म झाला. वडील बाळासाहेब आवारे हेही राज्यपातळीवरील कुस्तीपटू, शेतकरी. पण घरची परिस्थती तशी बेताचीच. अशा परिस्थतीतही वयाच्या सातव्या वर्षापासून वडिलांनी राहुल आणि त्यांचा भाऊ गोकुळला कुस्तीचे धडे देण्यास सुरूवात केली. मात्र व्यावसायिक कुस्तीला शहाराशिवाय पर्याय नाही, हे ओळखून त्यांच्या वडिलांनी राहुल यांना कुस्ती खेळण्यासाठी पुण्याला पाठविले.2004 पासून ते भवानी पेठेतील गोकुळ वस्ताद तालमीमध्ये 'रुस्तम-ए-हिंद' हरिश्चंद्र बिरासदार यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवू लागले. त्यांच्या निधनानंतर 2012 पासून पहिलवान काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कात्रज-आंबेगाव येथील तालमीमध्ये त्यांनी कुस्ती खेळण्यास सुरूवात केली.
राष्ट्रकुल स्पर्धेचे सुवर्णपदक ते अर्जुन पुरस्कार विजेते
राहुल यांनी कुस्तीमध्ये जोरदार मुसंडी मारीत 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर 2019ला कझाकिस्तानमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेतही कांस्य पदक मिळविले. त्यापाठोपाठ आशियायाई स्पर्धेमध्ये दोन कांस्य आणि एक रौप्य पदक त्यांनी पटकाविले. आवारे यांच्या या कामागिरीची दखल केंद्र सरकारने घेतली. त्यांना यावर्षी क्रीडा क्षेत्रातील मानाचा अर्जुन पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.
राज्य सरकारकडून 'डिवायएसपी'ची संधी
राज्य सरकारनेही राहूल आवारे यांच्या कुस्तीमधील कार्याची दखल घेऊन त्यांना राज्य पोलिस दलामध्ये थेट पोलिस अधिक्षक म्हणून नियुक्ती केली. एक वर्षापूर्वी त्यांचे नाशिक येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण सुरू झाले होते. शारीरिक, व्याख्याने, पोलिस प्रशासनात कसे काम करावे, गुन्ह्यांचा शोध कसा घ्यावा, या स्वरुपाचे एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण त्यांनी बुधवारी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते गुरूवारपासून पुणे पोलिस दलामध्ये 'डीवायएसपी' म्हणून रुजू होणार आहेत.
- पुणे पदवीधर मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; जादुई आकडा गाठण्यासाठी चुरस
कुस्तीतील 'सेलिब्रेटी'असूनही पाय जमीनीवरच
"मी स्वतः गरीब कुटुंबातुन पुढे आलो, गरिबीचे चटके सहन केले. त्यावेळी मला अनेकांनी मदत केली, ते ऋण मी कधीच विसरू शकणार नाही,' अशी भावना व्यक्त करणाऱ्या आवारे हे मागील एक वर्षापासून कुस्ती खेळणाऱ्या 8 मुलांचा खर्च करत आहेत. त्याचबरोबर वेळोवेळी अनेक गोरगरिबांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मदतीचा हातही देत आहेत.
"लहान असल्यापासूनच पोलिस दलातील नोकरीचे आकर्षण असायचे. कुस्ती खेळाकडे वळलो, त्यावर प्रामाणिकपणे लक्ष केंद्रित केले. मोठ्या कष्टाने इथपर्यंत पोचलो. त्यामुळे तोच प्रामाणिकपणा, कष्ट आणि धाडसाच्या आधारावर पोलिस अधिकारी म्हणून काम करू. सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याकडे आपला कायम कल असेल.''
- राहुल आवारे
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)