MPSC परीक्षा स्थगित करा अन्यथा...; मराठा क्रांती मोर्चानं काय दिलाय इशारा?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 October 2020

या परीक्षेचा अर्ज भरताना आरक्षण अस्तित्वात असल्याने मराठा तरुणांनी 'एसईबीसी' या प्रवर्गातून अर्ज भरला. कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली, त्यातच आता सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिली.

पुणे : मराठा आरक्षणाबद्दल राज्य सरकारने अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही, त्यामुळे लाखो विद्यार्थी संभ्रमात आहेत. अशा स्थिती राज्यात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा होणार आहेत. यात मराठा विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असल्याने या परीक्षा त्वरित स्थगित कराव्यात, अन्यथा परीक्षा उधळून लावल्या जातील, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला.

पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राहुल पोकळे यांनी ही माहिती दिली. यावेळी शहर समन्वयक सतीश काळे, जिल्हा समन्वयक परमेश्‍वर जाधव, प्रशांत चव्हाण, अनुप देशमुख यावेळी उपस्थित होते.

Breaking : हाथरसमध्ये मोठं षडयंत्र; उत्तर प्रदेश पोलिसांकडून १९ एफआयआर दाखल​

'एमपीएससी'तर्फे 11 ऑक्‍टोबर रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा, 1 नोव्हेंबर तर 22 नोव्हेंबरला अराजपत्रित गट ब च्या परीक्षा होणार आहे. या परीक्षेचा अर्ज भरताना आरक्षण अस्तित्वात असल्याने मराठा तरुणांनी 'एसईबीसी' या प्रवर्गातून अर्ज भरला. कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली, त्यातच आता सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिली. त्यामुळे मराठा तरुणांचे नुकसान होणार असल्याने आरक्षणाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत ही परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी राज्य सरकार आणि आयोगाकडे केली आहे. पण त्यावर काहीच उत्तर मिळत नाही. ही परीक्षा पुढे ढकलावी अन्यथा परीक्षा उधळून लावू, असे पोकळे यांनी सांगितले.

परीक्षार्थी प्रशांत चव्हाण म्हणाले, "माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. तसेच यापूर्वी जे विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, त्यांना अद्याप नेमणुकीची ऑर्डर दिली नाही. त्यांचे काय होणार याबद्दल काहीच बोलत नाहीत.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha warned that MPSC Prelims exams should be postponed