

मराठीच्या दुरवस्थेस आपणच जबाबदार
दहावीत मराठी विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरून ठळक बातम्या प्रसारित झाल्या. मराठी भाषेविषयी आपुलकी असणाऱ्यांना ही बाब निश्चितच खटकणारी वाटली. मराठीची दुरवस्था होण्यास आपणच जबाबदार आहोत. मराठी साहित्यात व्याकरणाला महत्त्व राहिलेले नाही. साहित्यात ठीक आहे; परंतु जेव्हा एखादी भाषा ‘विषय’ म्हणून शिकवला जातो तेव्हा विद्यार्थ्यांना व्याकरणाच्या दृष्टीने अवघड जाते हे या निकालावरून स्पष्ट होते. म्हणजे शिकवण्यात कमतरता दिसून येते. सरकारलाही मराठी भाषेविषयी अनास्था दिसून येते. त्याचे उदाहरण ‘मिसिंग लिंक’ किंवा ‘पंढरपूर कॉरीडॉर’. परप्रांतीय रिक्षाचालकांना मराठी भाषेची सक्ती करण्याची, त्यांना दमदाटी करण्यात काय अर्थ आहे.? अगोदर आपल्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे.
- दिगंबर कुलकर्णी, सिल्लोड
मराठी जनांसाठी लज्जास्पद बाब
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत राज्यातील ९४ हजार विद्यार्थी मराठीत नापास झाले असून पैकी ८० हजारांहून अधिक विद्यार्थी हे प्रथम मराठी भाषा घेतलेले आहेत. ही मराठी जनांसाठी लज्जास्पद बाब आहे. मराठी विषय दहावीपर्यंत अनिवार्य असलेल्या कायद्यात सुधारणा करून तो बारावीपर्यंत अनिवार्य असेल, अशी संबंधित कायद्यात दुरुस्ती करणे हे सरकारने मान्य केलेल्या मराठी भाषा धोरणात नमूद आहे. असे असूनही अद्याप ती दुरुस्ती करण्यात आलेली नाही. ज्या राज्यात सरकारी अनास्थेतून गेल्या दोन वर्षांत २५५ मराठी शाळा बंद पडल्या आहेत, ज्या राज्यात हिंदी सक्ती केली जाते, अशा अवस्थेत मातृभाषा मराठीचे महत्त्व आणि ममत्व ते काय असणार?
- बाळकृष्ण शिंदे, पुणे
लैंगिक अत्याचारामुळे महाराष्ट्र असुरक्षित
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो २०२४च्या अहवालानुसार महिला तसेच मुलींविषयी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात मुंबई तिसऱ्या; तर पुणे देशात पाचव्या, नागपूर नवव्या क्रमांकावर पोहोचले असल्याने पुरोगामी राज्य म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रासाठी लज्जास्पद बाब आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने जाहीर केलेल्या या आकडेवारीमुळे शहरातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्याचे गृहविभाग, राज्य पोलिस महासंचालक यांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहून मुंबई, पुणे, नागपूर शहराला लैंगिक अत्याचाराबाबत जो ठपका पडलेला आहे तो दूर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- शशिकांत जाधव, पुणे
खेळाडूंचे स्वागत व्हायलाच हवे
‘नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!’...सात्विकराज रेड्डीने व्यक्त केलेला हा संताप अगदी योग्यच आहे. भारतीय जर्सीचा अपमान आहे. खरोखरच आपली पुरुषांची संघ पूर्ण तयारीनिशी खेळला. लक्ष्य सेनला दुखापत झालेली असतानासुद्धा खेळावर लक्ष देऊन डोळ्यांचे पारणे फिटावे इतका सुरेख खेळ खेळला. डबल आणि सिंगल बॅडमिंटन खेळ खेळणारे खेळाडूसुद्धा प्रत्येक भारतीयांना अभिमान वाटेल इतकी अविस्मरणीय बॅडमिंटन स्पर्धा खेळले. थाॅमस करंडक स्पर्धेत ब्राँझपदक मिळवलेल्या आपल्या संघाचे कौतुक व्हायलाच हवे. ही तर स्पर्धा भारताबाहेर होती. मग तिकडून आलेल्या खेळाडूंचे स्वागत व्हायलाच हवे. तरच बॅडमिंटन खेळासह इतर खेळांमधील खेळाडूंचे मनोधैर्य नक्कीच वाढेल.
- सुजाता लेले
फारुक अब्दुल्लांना उपरती
‘काश्मिरी पंडितांचे प्रदेश सोडून जाणे सर्वांत मोठे नुकसान होते, काश्मीर सोडून गेलेल्या सर्वांनी पुन्हा त्यांच्या घरी यावे’, अशी प्रार्थना करतो...असे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी नुकतेच वक्तव्य केले. आता प्रश्न एवढाच आहे की फारुक अब्दुल्ला यांनी इतक्या वर्षांनंतर असे वक्तव्य का केले? काश्मीरच्या पंडितांना जेव्हा स्वतःची घरेदारे, मालमत्ता सोडून अतिरेक्यांच्या त्रासामुळे पलायन करण्याची वेळ आली होती तेव्हा फारुक अब्दुल्ला महाशय मजा बघत होते. त्यांना काश्मिरी पंडितांबद्दल कळवळा होता तर तेव्हाच त्यांनी अतिरेक्यांना पायबंद घातला असता. आता देशांतर्गत वातावरण बदलत आहे. देशभर भाजप सत्तेवर येत आहे हे पाहूनच आता फारुक अब्दुल्ला यांना उपरती आली आहे.
- श्रीधर वष्ट, कोल्हापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.