देश तोडण्याची भाषा करणाऱ्यांची पुण्यात सभा कशी होऊ शकते? 

शनिवार, 3 मार्च 2018

जगभरातील तब्बल 160 देशांची मते मिळवून संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय विधी आयोगावर सदस्य म्हणून नियुक्त झालेले अनिरुद्ध राजपूत नुकतेच पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले होते. "आयएलएस'चे माजी विद्यार्थी असलेले राजपूत यांच्याशी सलील उरुणकर यांनी साधलेला संवाद 

प्रश्‍न - पुण्याची एखादी अविस्मरणीय आठवण सांगू शकता? 
राजपूत - पुणे शहराच्या अनेक आठवणी आहेत. बालपण शहरातील गोपाळ गायन समाज रस्त्यावर गेले. वसंत व्याख्यानमालेत माझे 19 व्या वर्षी व्याख्यान झाले. "आयएलएस' विधी महाविद्यालयाचा सर्वोत्कृष्ठ विद्यार्थी म्हणून पुरस्कार मिळाला होता. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर हे सारे इथे राहिलेले आहेत. "मी कुठून आलो आहे', असे मला दिल्लीत लोक विचारायचे. त्या वेळी मी त्यांना सांगायचो की तुम्ही मला सांगू नका मी कुठून आलो आहे ते. माझ्या घरापासून सातशे मीटरवर बाजीराव पेशवे राहायचे, ज्यांनी अटकेपार झेंडा रोवला होता. माझ्या गावात राहणाऱ्या चिमाजी अप्पा यांनी दिल्लीचा तख्त हातोड्याने फोडला होता. ही माझ्या लोकांची परंपरा आहे. पण याच पुण्यासारख्या ठिकाणी काही लोक येऊन म्हणतात, हा देश तोडा आणि आपण त्यांची सभा होऊ देतो यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते? 

प्रश्‍न - विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? 
- भारतात तुम्ही जुगाड करून ओळखीने पुढे जाता असे चित्र जगात निर्माण केले जाते. पण हे असत्य आहे. भारतात आणि जगात काही व्हायचे असेल तर प्रामाणिकपणा आणि काबाडकष्ट करत नाही, तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. त्याच्याशिवाय जे यश मिळते ते मातीमोल आहे. कष्ट करून मिळणारे यश हे कायमस्वरूपी असते. हे पुण्यातील संस्कार आहेत. हृदय स्वच्छ ठेवून तसेच कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता कष्ट करा, रोज भरपूर वाचन करा. एक ध्येय घ्या, कष्ट करा आणि पुढे जा. देशाला तुमची गरज आहे. 

प्रश्‍न - नवीन कोणत्या खटल्यावर काम करता आहात? 
- गोपनीयतेची अट असल्यामुळे देशांची नावे सांगता येत नाही. पण खटल्यांचे स्वरूप सांगू शकतो. आंतरराष्ट्रीय न्यायालयात दोन प्रकरणे लवकरच जाण्याची शक्‍यता आहे. तसेच एक प्रकरण "इंटरनॅशनल ट्रिब्युनल फॉर द लॉ ऑफ सी' अखत्यारित लवकरच सुनावणीसाठी येणार आहे. दोन देशांतील करारांसंबधीचा एक वाद आणि एका देशासाठी जागतिक व्यापार संघटनेचे एक प्रकरण हाताळणार आहे. ही सर्व प्रकरणे प्राथमिक टप्प्यात आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Aniruddha Rajput interview sakal pune