'एक्‍स्पोर्ट क्वालिटीचं डाळिंब 20 रुपयानं दिलं'! 

Representational image of pomegranate
Representational image of pomegranate

निमगाव केतकी : येथील बस स्थानकासमोर आज सकाळी एक शेतकरी बारीक तोंड करून सांगत होता, 'एक्‍स्पोर्ट क्वालिटीचं डाळिंब अवघ्या वीस रुपयानं दिलं.' त्यावर पुढचा म्हणाला, 'तू राव लय नशीबवान हाय, माझं अवघ्या आठ रुपयानं अन्‌ तेबी बळंच दिलंय.' शंभर रुपये किलो भावाने विकलेल्या डाळिंब उत्पादकांची अशी अवस्था असताना द्राक्ष उत्पादकांवरही व्यापाऱ्यांना 'आधी माल घेऊन जावा, नंतर पैसे द्या' असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

मागील काही महिन्यापासून डाळिंबाचा पडलेला भाव आणखीच खालावत चालला आहे. निर्यातक्षम माल पंचवीस ते तीस रुपये किलोने विकावा लागत आहे. चांगल्या मालासही सतरा ते अठरा रुपये एवढा कमी भाव मिळत आहे. डाग पडलेला, थोडा जरी खराब असेल तर त्या मालाला व्यापारी हात लावायला तयार नाहीत. एकरी एक लाख रुपये खर्च करूनही हातात काहीच पडत नसल्याने खत-औषधाची उधारी कशी द्यायची, असा प्रश्‍न उत्पादकांपुढे आहे. 

द्राक्ष उत्पादकांची अवस्थाही वाईट आहे. सततच्या प्रतिकूल हवामानामुळे उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. बिरंगुडी-कळस येथील द्राक्ष उत्पादक ऍड. दयानंद सांगळे म्हणाले, ''मागील वर्षी जंबो द्राक्षाला स्थानिक बाजारात 130 रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. एकरी आठ टनांपर्यंत उत्पादन निघाले होते. यंदा खराब हवामानामुळे उत्पादन निम्म्यावर आले आहे. मागील वर्षी उत्पादन खर्च एकरी नव्वद हजार, तर यंदा एक लाख पंच्चावन्न हजार रुपये आला आहे. यंदा 65 रुपयांनी माल दिला. दहा दिवस उलटून गेले तरी विकलेल्या मालाचा अजून एक रुपयाही हातात आला नाही.

बागेत अर्धा टन माल शिल्लक आहे. व्यापाऱ्याला पाच-सहा वेळा फोन केला. माल घेऊन जावा; पैसे तुमच्या सोयीनं द्या म्हटलं तरी व्यापारी येईना. खराब वातावरणामुळे भीतीपोटी लोक मागेल या भावात द्राक्ष विकत आहेत. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून द्राक्ष, डाळिंबाच्या बागा उभ्या केल्या आहेत; मात्र उत्पादन खर्च निघणेही अवघड झाले आहे. सरकारने याकडे गांभीर्याने पाहून निर्यातीला चालना द्यावी.'' 

बाजारभावाचं कोडं सुटंना 
निमगाव केतकी, वरकुटे, शेळगाव या पट्ट्यातून मागील सहा महिन्यांपासून दररोज व्यापाऱ्यांकडे शंभर, तर मार्केटला शंभर असा दोनशे टन माल जात होता. आता हा आकडा शंभर टनांवर आला आहे. मालाची आवक कमी होऊनही भाव वाढण्याऐवजी घसरत कसा चाललाय, याचं कोडं शेतकऱ्यांना सुटंनासं झालं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com