ऑपरेशन थिएटर ते नाटकाचे थिएटर

ऑपरेशन थिएटर ते नाटकाचे थिएटर

पिंपरी  - एकीकडे रुग्णांचे ऑपरेशन करायचे आणि ऑपरेशन झाल्यानंतर लगेचच नाटकाची रंगीत तालीम किंवा नाट्यप्रयोगासाठी रंगमंचावर उभे राहायचे, असा अनुभव पेशाने डॉक्‍टर असलेले नाट्यकलाकार घेत आहेत. नाटकाविषयी असलेले प्रचंड प्रेम त्यांना जगण्यासाठी वेगळीच ऊर्जा मिळवून देत आहे. 

एका समान उद्देशाने एकत्र आलेल्या डॉक्‍टरांनी १९९९ मध्ये सुरू केलेली नाट्यचळवळ आज चांगलीच नावारूपाला आली आहे. तब्बल १९ वर्षांचा कालखंड उलटल्यानंतर या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. सुरवातीच्या टप्प्यात डॉ. संजीवकुमार पाटील यांच्यासह काही मोजक्‍याच डॉक्‍टरांनी नाट्यप्रेमातून एकत्र येत छोटे-मोठे नाट्यप्रयोग केले. २००१ पासून अथर्व थिएटर्स ही संस्था स्थापन करून स्वतंत्रपणे नाट्यप्रयोगांना सुरवात केली. संस्थेमार्फत आतापर्यंत विविध नाट्यप्रयोगांमध्ये सुमारे ४० डॉक्‍टरांनी सहभाग घेतला आहे. ‘नटसम्राट’, ‘तरुण तुर्क, म्हातारे अर्क’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’, ‘माकडाच्या हाती शॅंपेन’ असे विविध नाट्यप्रयोग डॉक्‍टर कलाकारांनी केले. नाटक करायचे ठरले की दोन महिने आधी दिवसभर डॉक्‍टरी पेशा सांभाळत रात्री साडेनऊनंतर पुढे तीन ते साडेतीन तास म्हणजे रात्री एक वाजेपर्यंत नाटकाच्या रंगीत तालमी करायच्या, असा या डॉक्‍टरांचा शिरस्ता आहे. वरिष्ठ सर्जन डॉ. जयंत महाजन, भूलतज्ज्ञ डॉ. संजीवकुमार पाटील, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. निर्मल डुमणे, आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. धीरज कुलकर्णी, फिजिओथेरपिस्ट डॉ. सुचेत गवई, कर्करोग सर्जन डॉ. राकेश नेवे, होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. संतोष मोरे, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. श्रीरंग गोखले, भूलतज्ज्ञ डॉ. स्मिता कुलकर्णी, लेखक डॉ. मंदार जोगळेकर, होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. श्‍याम अहिरराव, डॉ. विजय सातव असे विविध डॉक्‍टर नाट्यचळवळीला जोडले गेलेले आहेत.

सध्या ताणतणावाच्या आयुष्यात थोडा वेळ स्वतःची आवड जोपासण्यासाठी द्यावा, या उद्देशाने आम्ही डॉक्‍टर एकत्र येतो. नाटक किंवा नाटकाची रंगीत तालीम करताना काही डॉक्‍टरांना अचानक रुग्णाच्या ऑपरेशनसाठी जावे लागते. ते सांभाळून आम्ही नाटक करीत आहोत. 
- डॉ. संजीवकुमार पाटील

शालेय जीवनापासून मी नाटकांमध्ये काम करतो आहे. पुण्यात ‘पुरुषोत्तम’मध्येदेखील सहभाग घेत होतो. डॉक्‍टरी पेशा सांभाळत रंगमंचावर कष्ट उपसून केलेला अभिनय रसिकांच्या पसंतीस उतरल्यानंतर मिळणारा आनंद वेगळा असतो.
- डॉ. धीरज कुलकर्णी

कॉलेजपासूनच मला नाटकांची आवड आहे. डॉक्‍टरी पेशा सांभाळत पूर्वी नाटक करायचो. आता पूर्णवेळ मी नाटकासाठी देत आहे. त्यामुळे रोजच्या जगण्यात एक वेगळाच तजेला मिळतो.
- डॉ. सुचेत गवई

डॉक्‍टरी पेशा सांभाळताना नाटक करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. केवळ अभिनयापुरते मर्यादित न राहता आम्हाला नेपथ्य, प्रकाशयोजना अशा विविध बाबीदेखील सांभाळाव्या लागतात. 
- डॉ. निर्मल डुमणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com