पिंपरीत साकारतोय रिअलिस्टिक ह्यूमनॉइड रोबो

वैशाली भुते
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

आज भारतामध्ये मोठी बुद्धिमत्ता आहे; मात्र त्यासाठी आवश्‍यक सुविधा नाही. त्यामुळे अनेक शोध केवळ कागदावरच राहतात. आज संपूर्ण जगाशी स्पर्धा करताना आपल्याला ‘स्मार्ट’ होण्याची गरज आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या माध्यमातूनच ते शक्‍य आहे. विविध क्षेत्रांसाठी रोबोंचा विकास होणे आवश्‍यक आहे. हे तंत्रज्ञान सर्वसामान्य तसेच विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याचा मानस आहे. त्या दृष्टीने पुढील प्रयत्न असेल. 
- अनिल जैन

पिंपरी (जि. पुणे) - सौदी अरेबियाने नागरिकत्व दिलेल्या ‘सोफिया’ रोबो गेल्या काही दिवसांत संपूर्ण जगभरात चर्चेत असला, तरी पिंपरी-चिंचवडमधील अनिल जैन यांनी ‘रिअलिस्टिक ह्यूमनॉइड रोबो’ तयार केला आहे. रिअलिस्टिक प्रकारातील भारतातील पहिला ‘रोबो’ असल्याचा दावा त्यांनी केला असून, त्याच्या माध्यमातून ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या दिशेने पाऊल उचलले आहे. या रोबोचे नामकरण ‘वीर’ असे करण्यात आले आहे. 

उत्तम संवाद कौशल्य, दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करणे, उत्स्फूर्त प्रतिसाद देणे, काहीच सेकंदामध्ये ‘एनसायक्‍लोपिडिया’वरील संबंध माहितीचा गोषवारा (सर्च) घेऊन नेमकी माहिती पुरविणे, त्याबरोबरच हालचाली व हावभाव प्रदर्शित करण्याची क्षमता या ‘वीर’मध्ये आहे. ‘वीर’च्या निर्मितीसाठी जैन आणि त्यांच्या एका सहकारी मित्रानी जगभरातील तंत्रज्ञान, इलेक्‍ट्रॉनिकशी संबंधित विषयाचा अभ्यास केला आहे. 

जवळपास १४ महिन्यांच्या अथक प्रयत्नांतून त्यांनी ‘वीर’ची निर्मिती केली असून, त्यासाठी स्वत: मोठा निधी वापरला आहे. फार्मासिस्ट व छायाचित्रकार क्षेत्रात वावरणारे, मात्र तंत्रज्ञानाची आवड जोपासणाऱ्या जैन यांना काही वर्षांपूर्वी ‘रोटीमॅटिक’ या उपकरणाने भुरळ घातली. त्यातून प्रेरणा घेत त्यांनी वेगळ्या प्रकारचे उपकरण बनविण्याचा संकल्प केला. त्यांनी ‘रियालिस्टिक ह्यूमनॉइड रोबो’ बनविता येईल का, याची चाचपणी सुरू केली. त्यासाठी भारतातील अनेक तंत्रज्ञांशी चर्चादेखील केली. भारतामध्ये अशा प्रकारचा ‘रोबो’ प्रत्यक्षात साकारला गेला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यातूनच त्यांनी आपल्या एका सॉफ्टवेअर अभियंता मित्राच्या मदतीने ‘रोबो’ निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला. अनेक प्रयोग करून पाहिले. वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञानही हाताळून पाहिले. त्यातूनच हा ‘रोबो’ आकाराला आला. 

वैशिष्ट्ये
‘सोफिया’ रोबोमध्ये वापरलेल्या तंत्रज्ञानाहूनही अधिक सरस तंत्रज्ञान ‘वीर’मध्ये वापरले आहे. ‘लिसनिंग’, ‘सर्च टेक्‍नॉलॉजी’, ‘मेकॅनिझम’, ‘स्टॅंड अलोन मशिन’, ‘रिअल टाइम आन्सर’ अशी अनेक वैशिष्ट्य या ‘रोबो’ची आहेत. ३५ किलो ‘टॉर्क’ क्षमतेच्या परदेशी बनावटीच्या २५ सर्वो मोटर्स त्यात वापरल्या आहेत. 

चेहऱ्यावरील हावभाव महत्त्वाचे
‘सिलिकॉन रबर मास्क’च्या साह्याने या ‘रोबो’ला त्यांनी वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या केवळ चेहऱ्यावर भर दिला असला, तरी त्याचे संपूर्ण अवयव बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर, येत्या दोन महिन्यांत ‘रोबो’च्या एकंदर तंत्रज्ञानात अधिक बदल करून त्यात बारकावे आणणार असल्याचे जैन यांनी सांगितले.

‘वीर’चा वापर 
‘वीर’मध्ये वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा प्रभावीपणे उपयोग करू शकतो. लष्करामध्ये अचूक लक्ष्य भेदण्याबरोबरच सीमेवर गस्त घालण्यासाठी, वाहतूक नियमनासाठी, शिक्षण, वैद्यक, मनोरंजन क्षेत्रासाठीदेखील त्याचा ‘स्मार्ट’ पद्धतीने वापर करता येऊ शकतो. मेणाच्या पुतळ्यांच्या संग्रहालयाप्रमाणे रोबोटिक पुतळ्याचेही संग्रहालय असावे, असे त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: marathi news pimpri news realistic humanoid robot