बारामती महिला ग्रामीण रुग्णालयास राज्य शासनाचा पुरस्कार

मिलिंद संगई
शुक्रवार, 2 मार्च 2018

बारामती : राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणा-या काया कल्प अंतर्गत राज्य स्तरावरील द्वितीय क्रमांकाचे 20 लाख रुपयांचे पारितोषिक बारामतीच्या महिला ग्रामीण रुग्णालयास जाहीर झाले आहे. अवघ्या तीनच वर्षात राज्यस्तरावरील वैशिष्टयपूर्ण समजला जाणारा हा पुरस्कार या रुग्णालयाने पटकावल्याने बारामतीकरांनी आज आनंद व्यक्त केला. 

बारामती : राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणा-या काया कल्प अंतर्गत राज्य स्तरावरील द्वितीय क्रमांकाचे 20 लाख रुपयांचे पारितोषिक बारामतीच्या महिला ग्रामीण रुग्णालयास जाहीर झाले आहे. अवघ्या तीनच वर्षात राज्यस्तरावरील वैशिष्टयपूर्ण समजला जाणारा हा पुरस्कार या रुग्णालयाने पटकावल्याने बारामतीकरांनी आज आनंद व्यक्त केला. 

येथील डॉ. बापू भोई यांनी गेल्या तीन वर्षात या रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलून अधिकाधिक समाजाभिमुख करण्यासाठी मनापासून प्रयत्न केल्यानेच शासन स्तरावरही त्याची नोंद घेतली गेली. एप्रिल 2015 पासून फेब्रुवारी 2018 अखेरीस या रुग्णालयाने 3656 नॉर्मल प्रसूती तर 2012 सिझेरियन प्रसूती करुन तब्बल 5668 प्रसूती विनामूल्य करण्याचा नवीन विक्रमच प्रस्थापित केलेला आहे. 

या रुग्णालयामध्ये अवघे दहा रुपये भरुन केसपेपर काढल्यानंतर तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया, औषधे, इंजेक्शन किंवा रक्त लघवी तपासणी कशासाठीही एक रुपयाही द्यावा लागत नाही. पूर्णपणे शासकीय निधीतून महिलांवर प्रभावी उपचार येथे केले जातात.

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठपुरावा करुन अवघ्या 365 दिवसांत ही इमारत उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यानंतर शासन दरबारी पाठपुरावा करुन हे रुग्णालय अधिकाधिक सुसज्ज करण्याचा प्रयत्न केला. 

या तीन वर्षांच्या कालावधीत या रुग्णालयात 2067 गंभीर स्वरुपाच्या तर 3342 किरकोळ स्वरुपाच्या शस्त्रक्रियाही विनामूल्य करण्यात आल्या. या तीन वर्षांच्या कालावधीत या रुग्णालयात तब्बल 65744 महिलांची मोफत तपासणी करण्यात आली. तीन वर्षात या रुग्णालयात महिला तपासणीचा आलेख उंचावत असल्याने ही बाब सामाजिकदृष्टया दिलासादायक म्हणावी लागेल. 

काया कल्प योजनेअंतर्गत गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयास 50 लाखांचे प्रथम, बारामतीच्या महिला ग्रामीण रुग्णालयास 20 लाखांचे द्वितीय पारितोषिक जाहिर झाले आहे. रत्नागिरी, पुणे व वर्धा जिल्हा रुग्णालयांना प्रत्येकी 3 लाख रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाली. 

हा पुरस्कार गेल्या तीन वर्षात बारामतीच्या महिला ग्रामीण रुग्णालयासाठी योगदान देणा-या प्रत्येकाचाच आहे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे राज्यत द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
- डॉ. बापू भोई, जिल्हा महिला रुग्णालय बारामती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Pune News Baramati News Baramati Hospital