रात्र प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी आता ई-लर्निंग अभ्यासिका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

पुणे - स्पर्धा परीक्षेवर आधारित ऑडिओ बुक्‍स असो वा "रोबोटिक्‍स' तंत्रज्ञानावर आधारित... रात्र प्रशालेतील विद्यार्थ्यांना ऐकायला मिळणार आहे तेही ई-लर्निंग अभ्यासिकेच्या माध्यमातून. अगदी अवांतर वाचन करायचे असेल किंवा पाठ्यपुस्तकातील एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा असेल... या अभ्यासिकेतून विद्यार्थ्यांना माहितीचा खजिना उपलब्ध करून देण्यात आला आहे. दिवसभर मेहनत करून रात्र प्रशालेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेचा लाभ घेता येणार आहे.

निमित्त होते पूना नाइट हायस्कूल आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट कनिष्ठ महाविद्यालयातील ई-लर्निंग अभ्यासिकेच्या उद्‌घाटनाचे. रोटरी क्‍लब ऑफ पुणे कोथरूड आणि रोटरी क्‍लब ऑफ बिजपोर्ट यूएसएतर्फे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ही आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेली अभ्यासिका उघडण्यात आली आहे. या कार्यक्रमाला सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष विनायक आंबेकर, चिटणीस सुधीर चौधरी, रोटरीचे उज्ज्वल तावडे, माजी प्रांतपाल प्रमोद जेजुरीकर, "सकाळ'चे सहयोगी संपादक सुनील माळी, रोटरीचे प्रकल्प व्यवस्थापक हेरंब रसाळ आणि प्राचार्य अविनाश ताकवले उपस्थित होते.

जेजुरीकर म्हणाले, 'सातत्य आणि मनात जिद्द असेल तर आपण परिस्थितीवर मात करत आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. मनात शिक्षणाची आस असेल तर यश नक्कीच मिळते. या अभ्यासिकेतून ज्ञानाचा खजिना विद्यार्थ्यांसाठी खुला झाला आहे. अवांतर वाचनासह तंत्रज्ञानावर आधारित ऑडिओ बुक्‍स यात ऐकायला मिळतील. सध्या रोबोटिक्‍सचे नवे क्षेत्र विद्यार्थ्यांसाठी खुले असून, त्याची माहिती विद्यार्थ्यांनी आवर्जून घ्यावी.''

'ई-लर्निंग अभ्यासिका ही नवी संकल्पना आहे. त्यासाठी रोटरीने विविध प्रकारचे सॉफ्टवेअर आणि ऑडिओ बुक्‍स उपलब्ध करून दिले आहेत,'' असे तावडे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pune news e learning study room