वारंगवाडीतून क्वालालंपूरला व्हिडिओ कॉल

नंदकुमार सुतार
सोमवार, 12 मार्च 2018

पुणे - स्थळ- वारंगवाडी. काही दिवसांपूर्वी येथून एक व्हिडिओ कॉल मलेशियामध्ये जोडण्यात आला. तिकडून व्हिडिओसोबतच आवाज आला... हॅलो, मी माशेलकर बोलतोय. अन्‌ काय, हा प्रयोग यशस्वी होताच वारंगवाडीत आनंद व्यक्त करण्यात आला. कारण, दुर्गम भागातील हे गाव जगाशी जोडले गेले, इंटरनेटच्या माध्यमातून. त्यासाठी नवे तंत्रज्ञान वापरले गेले.

पुणे - स्थळ- वारंगवाडी. काही दिवसांपूर्वी येथून एक व्हिडिओ कॉल मलेशियामध्ये जोडण्यात आला. तिकडून व्हिडिओसोबतच आवाज आला... हॅलो, मी माशेलकर बोलतोय. अन्‌ काय, हा प्रयोग यशस्वी होताच वारंगवाडीत आनंद व्यक्त करण्यात आला. कारण, दुर्गम भागातील हे गाव जगाशी जोडले गेले, इंटरनेटच्या माध्यमातून. त्यासाठी नवे तंत्रज्ञान वापरले गेले.

व्हिडिओ कॉल अन्‌ त्यात काय नवल, असा प्रश्‍न कोणालाही सहज पडू शकेल. कारण आपण सारे इंटरनेटपर्वात वावरणारे लोक. इंटरनेट आणि त्यामुळे आलेल्या सर्व सुविधा, गुगल गुरू, सरकारी योजना, बॅंकांच्या सुविधा एका क्‍लिकवर किंवा तुमच्या बोटाच्या टिचकीवर आलेल्या आहेत. व्हिडिओ कॉल आता एवढा अंगवळणी पडलाय, की तो हक्कच वाटावा. या गावाची गोष्ट वेगळी आहे. वारंगवाडी म्हणजे मोठी वस्तीच. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्‍यातील दुर्गम गाव. इंटरनेट क्रांतीचा किरण अद्याप न पोचलेली हजारो गावे, पाडी, वस्त्या, तांडे आहेत. वारंगवाडी हे त्यातलेच. ग्रामीण भागामध्ये मोबाईल टेलिफोनची क्रांती टप्प्यात आलीय; पण इंटरनेट अद्याप वाकुल्या दाखवतेय.

पुण्यासारख्या शहरात मोबाईल इंटरनेटचा वेगाचा दावा १० ते २५ एमबीपीएस असा केला जात असला, तरी फोर-जीच्या जमान्यातही पाच एमबीपीएस म्हणजे पाच मेगाबाईट प्रतिसेकंद एवढा अधिकतम वेग सातत्याने मिळणे अवघडच आहे. मग दुर्गम आणि अतिदुर्गम ग्रामीण भागात छोट्या-छोट्या वस्त्यांमध्ये कसे काय इंटरनेट पोचणार? ही उणीव भरून काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरूच आहेत.

वारंगवाडी हे गाव तळेगाव दाभाडेपासून सुमारे चार-पाच किलोमीटर अंतरावर असेल. तेथे नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरनेट पोचवण्याचा प्रयत्न काही महिन्यांपासून सुरू आहे. त्यासाठी भारत विकास ग्रुपची टीम राबत आहे. उपकरणे बसविल्यानंतर काही दिवसांपूर्वी तेथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणातून मलेशियामध्ये व्हिडिओ कॉल करण्यात आला. ग्लोबल रिसर्च अलायन्सची वार्षिक परिषद क्वालालंपूरमध्ये सुरू होती. डॉ. रघुनाथ माशेलकर हे ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष आहेत. त्यांनी तेथून वारंगवाडीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्वत: डॉ. माशेलकर दुर्गम भागात इंटरनेट पोचण्यासाठी प्रयत्नशील आहेत. वारंगवाडीतून इंटरनेटच्या माध्यमातून झालेला हा पहिला व्हिडिओ कॉल होता, त्यामुळे तेथे प्रचंड औत्सुक्‍य होते. यासाठी ‘वाय-बॅक’ हे तंत्रज्ञान भारतात प्रथमच वापरण्यात आले.

काय आहे ‘वाय-बॅक’
आपल्या कानांवर वायफाय, वायमॅक्‍स हे शब्द नेहमी पडतात. आता ते दैनंदिनीतील शब्दही झाले आहेत. यापेक्षा वाय-बॅक तंत्रज्ञान खूप वेगळे आहे. जर्मनीतील प्रसिद्ध फ्रॉनहॉफर इन्स्टिट्यूटची वाय-बॅक ही देण आहे. ज्या ठिकाणी ऑप्टिकल फायबर नेटवर्क किंवा मोबाईल इंटरनेट पोचवणे व्यवहार्य नसते, तेथे वाय-बॅकचे काम सुरू होते. दुर्गम भागातील लोकसंख्या खूप कमी असते, त्यामुळे ग्राहकांची संख्याही कमीच. तेवढ्यासाठी दीड-दोन कोटींचे फोर-जी टॉवर उभे करणार कोण? किंवा ऑप्टिकल केबलचे प्रचंड गुंतवणुकीचे जाळे विणणार कोण? केंद्र सरकारने सुमारे पाच लाख ग्रामपंचायतींपर्यंत ऑप्टिकल फायबर जाळे पोचण्याची योजना आखली आहे. ते तेथून पुढे दुर्गम जनतेपर्यंत पोचण्याचे काम वाय-बॅक तंत्रज्ञान करेल आणि तेही खूप कमी खर्चात. 

सध्या वाय-बॅकचे नियंत्रण केंद्र वडगाव येथे उभे करण्यात आले आहे, तेथून काम पाहिले जाते. वाय-बॅकसाठीचे उपकरण सौरऊर्जेवरही चालते, शिवाय त्याला अंतर्गत बॅटरीदेखील आहे. त्यामुळे वीज नसली तरी काही अडणार नाही. तसेच, वाय-बॅकद्वारे वायफाय हॉटस्पॉट निर्माण करून मोबाईल, संगणकासाठीही इंटरनेट वापरता येऊ शकते. 

वारंगवाडीसोबतच सांघवी, वरळे या तीन-चार गावांमध्ये बीव्हीजीच्या प्रयत्नातून वाय-बॅकद्वारे इंटरनेट पोचण्याचा पथदर्शी प्रकल्प सुरू आहे आणि त्याला चांगले यश मिळते आहे. त्यामुळे छोट्या-छोट्या पाड्यांवर राहणाऱ्या जनतेचे जीवनमान बदलू शकते. हे लोक उर्वरित जगाशी जोडले जातील. हा पथदर्शी प्रकल्प पूर्ण झाल्यास आणि त्याची व्यवहार्यता सिद्ध झाल्यास केवळ याच भागातील नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील दुर्गम ते अतिदुर्गम भागात इंटरनेट क्रांती पोचेल आणि तेथील जनतेच्या विकासाला आणखी गती मिळेल.

Web Title: marathi news pune news varangwadi to kuala lumpur video call