विष्णू ताम्हाणे
विष्णू ताम्हाणे

खाकी वर्दीचा मॅरेथॉन विक्रम

कात्रज - क्षणाचीही उसंत नसणारे पोलिस, पन्नाशीत मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होतील आणि त्यात प्राविण्य मिळवतील असे कोण म्हणेल तर त्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही; परंतु हे शक्‍य करून दाखवले आहे एका पोलिस अधिकाऱ्याने. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील गुन्हे पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी. जिद्द आणि सततच्या सरावाच्या जोरावर सव्वा वर्षात सहा लांब पल्ल्याच्या मॅरेथॉन स्पर्धा विक्रमी वेळेत पूर्ण केल्या. अहमदनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या  मॅरेथॉन स्पर्धेततर ते उपविजेते ठरले.

आठवडाभरात वरिष्ठांच्या भेटी आणि नित्य कामाचा ताण असतानाच पोलिस ठाण्यातील दैनंदिन कामाची धांदल असतानाही पोलिस ठाण्यातर्फे आयोजित महिला मेळाव्याच्या नियोजनाची जबाबदारी ताम्हाणे यांच्याकडे होती. मेळाव्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी अहमदनगर येथे मॅरेथॉन स्पर्धा होती. मेळाव्यादिवशी सकाळी नऊ वाजता ताम्हाणे पोलिस ठाण्यात आले.

पाच वाजेपर्यंत ठाण्यातील महत्त्वाची कामे आटोपून महिला मेळाव्याच्या तयारीत सहकाऱ्यांसमवेत गुंतले. मेळावा दहा वाजता संपताच आकरा वाजता नगरकडे जाण्यास निघाले. पहाटे तीन वाजता पोचून केवळ दोन तासांची विश्रांती घेतली. सहा वाजता स्पर्धा स्थळी पोचले आणि जिद्दीने धावून स्पर्धेत उपविजेते पद पटकावले. बक्षीस समारंभाला न थांबता तडक पुण्यात आले आणि अकरा वाजता पोलिस ठाण्यात सेवेत हजर झाले.

कामाचा प्रचंड व्याप असूनही शारीरिक व मानसिक सक्षम राहून स्पर्धेत पहिल्या तीनमध्ये येणारच, असा त्यांनी निर्धार त्यांनी केला होता. त्यात ते यशस्वी झाले. स्पर्धेला जाणे टाळले असते, तर ती स्पर्धा जिंकण्यासाठी त्यांना वर्षभर थांबवे लागले असते. त्यांना काही केल्या वर्षभर थांबायचे नव्हते. गेल्या वर्षीच्या स्पर्धेत तिसरा क्रमांक थोडक्‍यात हुकला होता.

ठरल्याप्रमाणे स्पर्धेत या वर्षी सहभागी झाले, जिद्दीने धावले आणि उपविजेते पद पटकावले. ४५ वयाच्या पुढील वयोगटात दहा किलोमीटरचे अंतर एक्कावन्न मिनीटात पार करून त्यांनी हे उपविजेते पद मिळवले होते. 

केवळ वर्षभराच्या सरावाने यशाला गवसणी घालणारा आपला मॅरेथॉनपट उलगडून सांगताना ताम्हाणे म्हणाले, ‘शेतकरी कुटुंबात जन्मल्यामुळे लहानपणापासून अंगमेहनत आणि धावपळीची सवय होती. १९९५ ला पोलिस उपनिरीक्षकपदासाठी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर पोलिस दलातील दैनंदिन कामकाजात गढून गेलो. त्यानंतर जमेल  त्या वेळी चालत होतो. त्यातही सातत्य राहिले नव्हते. याच दिनक्रमात वीस वर्षे कधी निघून गेली हे समजलेच नाही. 

लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे मुंबई मुख्यालयात जून २०१६ मध्ये माझी नियुक्ती झाली. सकाळी अकरा ते साडेपाच ही ड्युटी होती. सकाळी आणि संध्याकाळी चालण्यासाठी वेळ मिळत होता. किमान तासभर तर नियमीत चालत राहिलो. २०१७ मध्ये अहमदनगरला बदली झाली. तेथेही चालण्याचा व्यायाम कायम ठेवला. याच काळात माझे सहकारी चालक अंबादास  हुलगे हे नियमित धावण्याचा सराव करून मॅरेथॉनमध्ये सहभागी होताना मी जवळून पाहत होतो. 

हुलगे हे नेहमी मॅरेथॉन आणि धावण्याचे महत्त्व सांगायचे. ते ४५ वर्षांचे असताना त्याचे वजन ११५ किलो होते. दोन वर्षे धावून त्यांनी वजन ७४ किलो केले होते. त्यांच्याकडून मी प्रेरणा घेतली आणि जानेवारी २०१८ पासून धावायला सुरवात केली. 

सतत धावण्याच्या व्यायामामुळे जिंकण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. मन आणि शरीराला उर्जा प्राप्त होते. कार्यक्षमता वाढून आव्हाने पेलण्याचे बळ मिळते. आत्मविश्वासात वाढ झाल्यामुळे कठीण प्रसंगावर मात करण्याची क्षमता प्राप्त होते. वय कोणतेही असूदे धावा, आत्मबल आणि मनोबल प्राप्त करा. सकारात्मक, सक्षम आणि आरोग्यसंपन्न व्हा हा संदेश मी या उपक्रमातून देण्याचा प्रयत्न करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com