वंशाच्या दिव्यासाठी सासरचे करायचे छळ; अखेर कंटाळून तिनं संपवलं जीवन

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

लता यांचा पती मंगेश, दीर श्रीकांत, त्याची पत्नी अर्चना यांच्याकडून शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. त्यांना सातत्याने शिवीगाळ करून, टोचून बोलून अपमान केला जात होता.

पुणे : एकीकडे स्त्री भ्रूण रस्त्यावर, कचऱ्याच्या पेटीत सोडून दिल्याच्या घटना शहरात घडत असतानाच दुसरीकडे मुलगा होत नाही, म्हणून सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळास कंटाळलेल्या विवाहितेवर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचा प्रकार शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात घडला आहे. या घटनेतून वंशाला दिवा पाहिजेच या समाजाच्या मानसिकतेमध्ये अजूनही बदल झाला नसल्याचे धक्कादायक वास्तव देखील पुढे आले आहे. 

...यासाठी गुप्तवार्ता यंत्रणा सक्षम व्हायला हवी; गृहमंत्री देशमुख यांचे प्रतिपादन​

लता झांबरे (वय २९) यांचे १२ वर्षांपूर्वी मंगेश बिभीषण झांबरे याच्याशी लग्न झाले होते. त्यांना दोन मुली झाल्या होत्या. मात्र, त्यांना मुलगा नव्हता. नेमक्‍या याच कारणावरुन लता यांचा पती मंगेश, दीर श्रीकांत, त्याची पत्नी अर्चना यांच्याकडून शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. त्यांना सातत्याने शिवीगाळ करून, टोचून बोलून अपमान केला जात होता.

या सगळ्या त्रासामुळे लता या कंटाळल्या होत्या. या सर्व जाचाला वैतागून त्यांनी नऱ्हे गावातील अभिनव कॉलेजवळ असणाऱ्या त्यांच्या राहत्या घरी १३ सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, या प्रकाराबाबत त्यांचा भाऊ सचिन पंडीत (वय २६, रा.नेकनूर, बीड) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. 

शिक्षक भरतीबाबत शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत; हजारो उमेदवारांच्या भवितव्याचा प्रश्न सुटणार?​

या प्रकरणाचा तपास सिंहगड पोलिसांकडून करण्यात आला. चौकशीअंती मुलगा होत नसल्याच्या कारणावरुन लता यांचा मानसिक आणि शारिरीक छळ होत असल्याने त्यांनी आत्महत्या केली. तसेच त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, दीर आणि जावेविरुद्ध सिंहगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, शहरात काही दिवसांपूर्वीच स्त्री जातीचे भ्रूण रस्त्याच्याकडेला सोडून दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यापूर्वीही जुळ्या बाळांना पाषाण तलावाजवळ सोडल्याचा प्रकार घडला होता. या घटना घडण्याचे प्रकार थांबत नसतानाच मुलगा नसल्याच्या मानसिकतेतून महिलेचा छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना पुण्यात घडत असल्याची सद्यस्थिती आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: married woman committed suicide after being harassed by her relatives