पुणे : विवाहितेला सासरकडून करण्यात येत होती हुंड्याची मागणी मग...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

- सासरच्या मंडळींकडून विवाहितेला दिला जात होता त्रास.

कामशेत : सासरच्या जाचाला कंटाळून सांगिसे येथील विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत विवाहितेचा पती, सासरा, सासू, दीर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुप्रिया राहूल ढवळे  (वय २४) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ( दि.१४ ) सकाळी साडे सात पूर्वी सुप्रिया हिने साडीने गळफस घेऊन आत्महत्या केली. तिला उपचारासाठी सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता, सुप्रिया मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तिच्यावर माहेरी महागाव (आंदर मावळ) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुप्रियाचे वडील भरत दत्तू जाधव ( रा.महागाव ) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणी पती राहूल लक्ष्मण ढवळे  (वय ३१), सासू सावित्रीबाई लक्ष्मण ढवळे  (वय ६०), सासरे लक्ष्मण गोविंद ढवळे  (वय ६४), जाऊ शीतल स्वप्निल ढवळे  (२४), दीर स्वप्निल लक्ष्मण ढवळे  (वय २७) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सासरच्या मंडळींकडून हुंड्याची मागणी होत असल्याचा आरोप सुप्रियाच्या नातेवाईकांनी केला. तिच्या मागे आरूष व दूर्वा ही दोन मुले आहेत. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Married Woman Suicide in Kamshet

टॅग्स