
Matrix Rhythm Therapy : पेशींची ऊर्जा वाढविणारी मॅट्रिक्स रिदम थेरपी
पुणे : मानवी शरीरातील प्रत्येक पेशीची ऊर्जा वाढवून वेदनामुक्त करणारी ‘मॅट्रिक्स रिदम थेरपी’ आता देशात मूळ धरू लागली आहे. या थेरपीत कोणत्याही औषधांचे प्रिस्क्रिप्शन नसल्याने त्याच्या रिॲक्शनचा धोका नाही. विशिष्ट उपकरणांच्या मदतीने नैसर्गिक कंपन तयार करून पेशींमधील ऊर्जा वाढविण्याचा यशस्वी प्रयोग मॅट्रिक्स रिदम थेरपीमध्ये केला आहे.
या थेरपीचे संशोधन जर्मनीतील संशोधक डॉ. उलरीक रंडोल यांनी केले. डॉ. रंडोल हे मॅक्सिलोफेशिअल सर्जन आहेत. त्यांनी जबड्याच्या गुंतागुंतीच्या अनेक शस्त्रक्रिया यशस्वी केल्या. त्याचवेळी ते रुग्णाच्या वेदना कमी करण्याचे वेगवेगळे उपाय शोधत होते. या शोधातूनच त्यांची मानवी शरीरातील पेशी संस्थांचा अभ्यास सुरू केला. भारतात ही थेरपी अनिल देशपांडे यांनी आणली.
...असे केले संशोधन
डॉ. रंडोल यांनी १९८९ ते ९७ या दरम्यान पेशीची कार्यप्रणाली व्हिडिओ मायक्रोस्कोपखाली अभ्यासली. त्यातून असा निष्कर्ष निघाला की, शरीरातील पेशी आणि त्याच्या भोवतीच्या वातावरणाशी विशिष्ट पद्धतीने कंप पावतात. ही कंपने डॉ. रंडोल यांनी मोजली. पेशीची ही कंपने एका सेकंदात आठ ते बारा वेळा होतात, असे निरीक्षण नोंदविले.
पेशींच्या तालबद्ध कार्याचे निरीक्षण
नैसर्गिक सूक्ष्म कंपनांमुळे पेशी त्यांच्या बाहेरील वातावरणातून ऑक्सिजन आणि इतर जीवनसत्वे घेतात. त्यातून मायटोकाँड्रीया घटकाच्या मदतीने पेशी ऊर्जा तयार करते. त्यामुळे पेशींचे वातावरण आणि त्यातील कंपन या आधारे शरीराचे कार्य सुरळीत होते. संगीत मैफिलीत गायकाच्या सूराबरोबर सर्व संगितवाद्यांचा ताल एकरूप होतो. त्याच पद्धतीने मेंदू, हृदय, फुफ्फुस एकमेकांशी एकरूप होतात. त्यावेळी आपले शरीर तालबद्ध म्हणजे ‘रिदम’मध्ये असते.
मॅट्रिक्स रिदम थेरपी काय करते?
नैसर्गिक कंपने तयार करण्यासाठी विशिष्ट मशिन विकसित केले. पेशींची नैसर्गिक कंपने आणि मशिनची कंपने यात साधर्म्य असते. त्यामुळे मशिनच्या कंपनांच्या तालावर पेशीमध्ये बदल सुरू होतो. तेथे पुन्हा ऊर्जा निर्मिती सुरू होते. त्यातून स्नायू आणि पेशींना बळ मिळते. त्यातून रुग्णाच्या वेदना थांबतात.
बाह्य वातावरणातील ‘मॅट्रिक्स’
आपण हवा, अन्न, पाणी, सूर्यकिरण, आवाजाच्या लहरी बाहेरील वातावरणातून घेतो. त्याच धर्तीवर मानवी पेशींनाही बाह्य वातावरणातून (मॅट्रिक्स) पोषक घटक मिळतात. दूषित पाणी, विषारी घटक, जिवाणू, विषाणू यांनी शरीरात प्रवेश केल्यानंतर पेशी या रोगजंतूशी लढते. त्यातून काही द्रव्य तयार होते. त्यातून पेशीचे बाह्य वातावरणात असलेले कंपन यातील लय बिघडते. याचा परिणाम मज्जातंतु, रक्तवाहिन्या यांच्यावर होऊन तेथील कार्य बिघडते व माणूस आजारी पडतो.