कोल्हापूरच्या माऊली जमदाडेने पंजाबच्या मनजितसिंहला केले चितपट

राजकुमार थोरात 
रविवार, 6 मे 2018

कळंब येथे कै. बाबासाहेब फडतरे-देशमुख यांच्या नवव्या पुण्यतिथी निमित्त शनिवार (ता. 5) ला लाल मातीतील भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेमध्ये 250 पेक्षा जास्त कुस्त्या पार पडल्या.

वालचंदनगर - कळंब (ता. इंदापूर) येथे लाल मातीमध्ये झालेल्या कुस्तीस्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या माऊली जमदाडेने पंजाबच्या 115 किलो वजनाच्या मनजितसिंह खत्रीला बॅक सालतो. डावाने पराभूत करुन आसमान दाखविले व सलग दुसऱ्याचा वर्षी विजयी होण्याचा बहुमान मिळविला. 

कळंब येथे कै. बाबासाहेब फडतरे-देशमुख यांच्या नवव्या पुण्यतिथी निमित्त शनिवार (ता. 5) ला लाल मातीतील भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेमध्ये 250 पेक्षा जास्त कुस्त्या पार पडल्या. अंतिम कुस्ती कोल्हापूरच्या माऊली जमदाडे व  पंजाबच्या मनजितसिंह खत्री यांच्यामध्ये झाले. अठरा मिनटे दोघांंमध्ये चुरशीची लढत सुरु होती. शेवटच्या टप्यामध्ये  माऊली जमदाडे आक्रमक झाला होता. त्याने 115 किलो वजनाच्या मनजितसिंह बॅक सालतो डावाने पराभूत केले व प्रथम क्रंमाकाची  कुस्ती जिंकण्याचा बहुमान मिळवला. दुसऱ्या क्रंमाकाची कुस्तीमध्ये कौतुक दाफळे याने विजय धुमाळ व तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये कोल्हापूरच्या योगेश बोंबाळे याने दिल्लीच्या अमितकुमार विजय मिळवला. पोपट घोडके याने कार्तिक काटे, सुनिल शेवतेकर याने सिकंदरचा पराभव केला. मुलींच्या मॅटवरती कुस्ती स्पर्धा पार पडल्या. यामध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती मुरगुडच्या अंकिता शिंदेने पन्हाळाच्या राष्ट्रीय पातळीवरतील विजेती अस्मिता पाटीलचा पराभव करुन मुलींच्यामधील पहिल्या क्रंमाकाची कुस्ती जिंकली. वेदांतिका पवार हिने सायली दंडवते, शिवांजली शिंदे हिने दिव्या डावरे, अनुष्का भाट ने अंजली पाटील, नेहा चौगुलेने अलिशा कांबळ, सोनम सरगर हिने मेघना सोनुलेचा पराभव केला. कुस्तीच्या मैदानाला खासदार राहुल शेवाळे, आमदार बबन शिंदे, नारायण पाटील, सुधाकरपंत परिचारक, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष   संजीव राजे नाईक- निंबाळकर, नगरसेवक रविंद्र माळवदकर उपस्थित होते.कुस्ती स्पर्धेचे फडतरे उद्योग समुहाचे अध्यक्ष उत्तम फडतरे,दत्तात्रेय फडतरे यांनी केले होते.कुस्ती स्पर्धा पार पडण्यासाठी संदीप पानसरे, के. बी. गळवी, अनिल तांबे यांनी परिश्रम घेतले.

मान्यवरांचा गौरव -
यावेळी कुस्तीच्या मैदानामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिल्याबद्दल, पद्मश्री डाॅ. तात्यासाहेब लहाने, डॉ. शंकर तोडकर, डाॅ. वासू, उद्योजक अर्जून देसाई, मयुर कुदळे, उल्हास ढोले पाटील, आनंद माेकाशी यांचा सन्मानपत्र देवून फडतरे उद्याेग समुहाच्या वतीने गौरव करण्यात आला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mauli Jamdade of Kolhapur defeated Manjitsinh of Punjab in the wrestling