बरं झालं! आम्हाला आमची स्वतंत्र बाजार समिती पुन्हा मिळाली

गजेंद्र बडे
Thursday, 10 September 2020

वर्षभरापुर्वी मुळशी आणि हवेली या दोन कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे एकत्रीकरण करून नव्याने पुणे प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आली होती. या प्रादेशिक समितीचे विभाजन करून पुन्हा पुर्वीप्रमाणेच हवेली व मुळशी तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समितीची स्थापना करण्यात आली आहे. सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण)  मिलिंद सोबले यांनी याबाबतची अधिसूचना बुधवारी (ता.९) प्रसिद्ध केली आहे. 

पुणे : आधी आमच्या तालुक्यासाठी स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती अस्तित्वात होती. पण मधीच सरकाराच्या काय मनात आलं, काय जाणू. आमची बाजार समिती पुणे बाजार समितीत विलीन केली. यामुळं आमच्या तालुक्याची हक्काची बाजार समिती गेली होती. पण आजच्या या निर्णयामुळे आम्हाला आमची हक्काची बाजार समिती पुन्हा मिळाली असल्याची भावना मुळशी तालुक्यातील कोंढावळे येथील प्रगतीशील शेतकरी अरुण चौधरी यांनी व्यक्त केली तर, यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळू शकेल, अशी बोलकी प्रतिक्रिया लवळे (ता.मुळशी) येथील शेतकरी बाळासाहेब आल्हाट यांनी या निर्णयावर बोलताना दिली आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वर्षभरापुर्वी मुळशी आणि हवेली या दोन कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे एकत्रीकरण करून नव्याने पुणे प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आली होती. या प्रादेशिक समितीचे विभाजन करून पुन्हा पुर्वीप्रमाणेच हवेली व मुळशी तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समितीची स्थापना करण्यात आली आहे. सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण)  मिलिंद सोबले यांनी याबाबतची अधिसूचना बुधवारी (ता.९) प्रसिद्ध केली आहे. 

यानुसार हवेलीच्या बाजार समितीला पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती तर, मुळशीच्या समितीला  मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती असे नाव देण्यात आले आहे. पुणे प्रादेशिक बाजार समितीचे मुख्यालय हे हवेलीचे मुख्यालय असणार आहे. मुळशी बाजार समितीचे मुख्यालय ताथवडे येथे १०० एकर जागेवर प्रस्तावित करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भोरचे आमदार संग्राम थोपटे आणि शिरुरचे आमदार अशोक पवार यांनी दोन्ही तालुक्यासाठी प्रत्येकी स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करत, त्याबाबत पाठपुरावा केला होता. यानुसार या मागणीच्या पुर्ततेसाठी  सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत मंत्रालयात तीन महिन्यांपुर्वी बैठकही झाली होती. या बैठकीतच बाळासाहेब पाटील यांनी विभाजनाचे संकेत दिले होते.

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील परिसर, पुणे, खडकी, देहुरोड कॅन्टोन्मेंट आणि हवेली तालुक्‍यातील सर्व गावांचा तर मुळशी समितीत मुळशी तालुक्यातील सर्व गावांचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आशिया खंडात सर्वात मोठी बाजार समिती असा नावलौकीक असणाऱ्या हवेली कृषी बाजार समितीची सत्तासुत्रे तब्बल सोळा वर्षानंतर पुन्हा हवेलीकरांच्या हातात येणार आहेत.

प्रशासकांची नियुक्ती 

नव्याने अस्तित्वात आलेल्या या दोन्ही बाजार समित्यांवर स्वतंत्र प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. यानुसार पुणे बाजार समितीच्या प्रशासकपदी मधुकांत गरड यांची तर, मुळशीच्या प्रशासकपदी अरुण साकोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुळशीकडे साडेसतरा कोटींचे देणं

दरम्यान, मुळशी बाजार समितीकडे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे १७ कोटी ५८ लाख ७ हजार ३७३ रूपयांचे देणं (कर्ज) असणार   आहे. हे देणं पाच वर्षांत फेडण्याचे बंधन मुळशी बाजार समितीवर असणार आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mavals farmers are satisfied with the division of the Pune market committee