'जम्बो सेंटर'नंतर आता पश्‍चिम पुण्यासाठी नवं कोरोना हॉस्पिटल; महापौरांनी दिली माहिती

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 August 2020

कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करण्यासाठी बाणेरमध्ये उभारलेल्या स्वतंत्र कोविड हॉस्पिटलचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. २८) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.

पुणे : कोरोनाची साथ आणि त्याच्या परिणामांनी पुण्याच्या आरोग्य व्यवस्थेचे मूल्यमापन झाल्यानेच बाणेरमध्ये कोविड हॉस्पिटल उभारले गेले. या सुविधेची व्याप्ती वाढवून ती पुणेकरांच्या सेवेत कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे. कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर पश्‍चिम पुण्यासाठी हे हॉस्पिटल असेल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी (ता.२६) सांगितले.

वडिलोपार्जित मालमत्ता एकट्याला हवी आहे, तर...

कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करण्यासाठी बाणेरमध्ये उभारलेल्या स्वतंत्र कोविड हॉस्पिटलचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. २८) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर महापौर मोहोळ, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी हॉस्पिटलची पाहणी केली. तसेच आयसीयू, ऑक्‍सिजन बेडसह रुग्ण आणि डॉक्‍टरांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधांबाबत महापौरांनी काही सूचना केल्या. 

ग्रामपंचायत सदस्याने लाटलेले अनुदान पुन्हा शासनाच्या खिशात; वाचा काय आहे प्रकरण​

काय असणार हॉस्पिटलमध्ये? 
- आरोग्य यंत्रणा सक्षमीकरणास प्राधान्य 
- नवनवीन उपाययोजना करण्यात येणार 
- गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत उपचार 
- आयसीयू आणि ऑक्‍सिजनची सुविधा 

नऊशे रुग्णांसाठी सुविधा 
बाणेर येथील महापालिकेच्या मालकीच्या पाच एकर जागेत तात्पुरत्या स्वरुपाचे कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. भविष्यात येथे इमारतींची संख्या आणि हॉस्पिटलची क्षमता वाढवून ८०० ते ९०० रुग्णांना सामावून घेता येईल, अशा प्रकारचे नियोजन महापालिका प्रशासन करत आहे. कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर या हॉस्पिटलचे स्वरूप ठरविण्यात येईल. त्यासाठी गरजेनुसार वेगाने कार्यवाही केली जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayor Murlidhar Mohol informed that new hospital has been set up for West Pune