esakal | 'पीएमपी'साठी महापौर मोहोळ घेणार पुढाकार; बससेवा लवकर सुरू होण्याची शक्यता!
sakal

बोलून बातमी शोधा

Murlidhar_Mohol

महापौर मोहोळ आता येत्या दोन दिवसांत दोन्ही महापालिकांतील पदाधिकारी, संबंधित अधिकारी आणि पीएमपीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

'पीएमपी'साठी महापौर मोहोळ घेणार पुढाकार; बससेवा लवकर सुरू होण्याची शक्यता!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीची वाहतूक सुरू करण्याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ आता पुढाकार घेणार आहेत. त्यासाठीची दोन्ही महापालिकांमधील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून बससेवा सुरू करण्याचा निर्णय ते जाहीर करणार आहेत. दरम्यान, बससेवा सुरू करण्यासाठीचा आराखडा पीएमपीने तयार केला आहे.

दोन्ही शहरांतील पीएमपीची वाहतूक १८ मार्चपासून टप्प्याटप्प्याने बंद आहे. सध्या फक्त अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीची वाहतूक सुरू आहे. बससेवा सुरू करावी, म्हणून प्रवाशांनीही मागणी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर बससेवा सुरू करण्याबाबत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी अनुकूलता दर्शविली आहे. त्यानुसार महापौर मोहोळ आता येत्या दोन दिवसांत दोन्ही महापालिकांतील पदाधिकारी, संबंधित अधिकारी आणि पीएमपीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर पीएमपीचा निर्णय होईल.

...म्हणून खासदार गिरीश बापटांनी 'जम्बो' आंदोलन केले स्थगित!​

महापौर मोहोळ म्हणाले, "दोन्ही शहरांत कोरोनाचे रुग्ण अजून मोठ्या संख्येने आहेत. बससेवा सुरू करताना कोणत्या मार्गांवर ती सुरु करायची, त्या भागातील परिस्थिती कशी आहे, याचा आढावा घेण्यात येईल. त्यानुसार बस वाहतुकीचे मार्ग निश्‍चित करण्यात येतील. त्यानंतर बससेवा सुरू करण्यात येईल. मात्र, पुरेशी काळजी घेऊन ही सेवा लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न असेल.'' दरम्यान, दोन्ही महापालिकांनी परवानगी दिल्यावर बससेवा लगेचच सुरू करण्याची तयारी असेल, असे पीएमपीने स्पष्ट केले आहे.

शहरात रेल्वे, विमान, कॅब, रिक्षा आदींची वाहतूक सुरू झाली आहे. एसटी वाहतूकही आता गुरुवारपासून सुरू होणार आहे. मात्र, पीएमपी अद्याप बंद आहे. त्यामुळे विशेषतः कष्टकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यांच्याकडे खासगी वाहने नाहीत. त्यामुळे त्यांना रिक्षावर अवलंबून राहवे लागत आहे. परंतु, तिचे दर त्यांना परवडत नाहीत. त्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर बससेवा सुरू करावी, यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांनीही दोन्ही महापालिकांकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

'अटल रँकिंग'मध्ये पुण्यातील कॉलेजांचा दरारा कायम; 'सीओईपी' ठरलं नंबर वन!

125 कोटींचे उत्पन्न बुडाले
बससेवा २५ मार्चपासून बंद असल्यामुळे पीएमपीचे सुमारे १२५ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. तसेच पीएमपीचे सुमारे पाच हजार कर्मचारी दोन्ही महापालिकांत प्रतिनियुक्तीवर पाठविण्याची पीएमपीवर वेळ आली आहे. सध्या अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी पीएमपीच्या बस वापरल्या जातात. परंतु, त्यातही पीएमपीला फारसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे पीएमपीची आर्थिक कोंडी झाली आहे.

पीएमपीला दोन्ही महापालिकांकडून संचलनातील तूट मिळते. त्यातून बससेवा चालते. मात्र, प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे पीएमपीचे रोजचे सुमारे दीड कोटी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. त्यामुळे लवकरात लवकर वाहतूक सुरू व्हावी, असा पीएमपी प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी पीएमपीने दोन्ही महापलिकांकडे पाठपुरावा केला आहे. पीएमपीचे संचालक आणि नगरसेवक शंकर पवार यांनीही पीएमपीची सेवा सुरू करण्यासाठी दोन्ही महापालिकांच्या आयुक्तांकडे पत्र पाठविले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top