Measles Vaccine : लसीकरणाचे वेळापत्रक कोलमडल्यानेच गोवर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Measles Vaccine collapse vaccination schedule child health news pune corona

Measles Vaccine : लसीकरणाचे वेळापत्रक कोलमडल्यानेच गोवर!

पुणे - कोरोना उद्रेकात लहान मुलांचे लसीकरणाचे वेळापत्रक कोलमडले होते. त्यानंतर गोवर प्रतिबंधक लस न घेतलेल्या मुलांना सध्या गोवर होत आहे. पालकांनीही आपल्या मुलाचे गोवर प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन बालरोग तज्ज्ञांनी केले.

मुंबईमध्ये काही भागात गोवरचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमिवर पुण्यातील पालकांना बालरोगतज्ज्ञांनी हे आवाहन केले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात गोवरच्या रुग्णांचे प्रमाण नसले तरीही त्याची लक्षणे असलेल्या मुलांची संख्या वाढत आहे, असे निरीक्षण असल्याचे वेगवेगळ्या बालरोगतज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

संजीवन व्हिटालाइफ मेडिपॉइंट रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास तांबे म्हणाले, कोरोना उद्रेकात बहुतांश मुलांचे लसीकरण झाले नाही. बाळाच्या वयाच्या नवव्या महिन्यात आणि दुसरा पंधराव्या महिन्यातील लसीचा डोस चुकल्यामुळे गोवरचा धोका वाढतो. ज्या बाळांचे हे डोस झाले आहेत, त्यांना गोवरची साथ आली तरीही त्यापासून संरक्षण मिळते. मात्र, ज्यांचे डोस चुकले आहेत, त्यांचा धोका वाढतो. त्यामुळे गोवर प्रतिबंधक लसीकरण वेळेत पूर्ण करा.

दुष्परिणाम काय?

  • रुग्णाच्या शरीरातील ‘अ’ जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी होते

  • त्यामुळे डोळ्यांचे आजार व अतिसार, न्यूमोनिया, मेंदूज्वर अशा आजारांचा धोका वाढतो

    असा होतो आजार

  • विषाणूंपासून पसरणारा गोवर हा आजार आहे

  • हा विषाणू रुग्णांच्या खोकल्याद्वारे हवेमार्फत पसरतो

  • व्यक्तीच्या श्वसन संस्थेतून हा विषाणू शरीरात जातो

लक्षणे

ताप येणे, डोळे लाल होणे शरीरावर लाल पुरळ येणे, दोन-चार दिवसानंतर पुरळ कानाच्या मागे, चेहरा, छाती, पोटावर पसरतात

लस कुठे उपलब्ध?

गोवर प्रतिबंधासाठी लसीकरण प्रभावी मार्ग असून प्रत्येक सरकारी रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध आहे. वेळापत्रका प्रमाणे लसीकरण केल्यास गोवर रोग टाळता येतो. लसीचा पहिला डोस नऊ महिने पूर्ण ते १२ महिने व दुसरा डोस १६ ते २४ महिने या वयोगटात देतात.