वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग सुकर;आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून "सकारात्मक' शेरा  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग सुकर;आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून "सकारात्मक' शेरा 

येत्या शैक्षणिक वर्षापासून (2021-22)महाविद्यालयात शंभर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची शिफारस विद्यापीठाने राज्य सरकारकडे केली आहे.सरकार आणि नॅशनल मेडिकल कमिशन (एनएमसी) परवानगीनंतर महाविद्यालय सुरू होईल.

वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग सुकर;आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून "सकारात्मक' शेरा 

पुणे - कोरोनाच्या साथीत आणि ऐन दिवाळीतच पुणेकरांच्या आरोग्याशी संबंधित चांगली बातमी आहे. पुणेकरांना स्वस्तात आरोग्य सेवा पुरविण्यासाठी महानगर पालिकेच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावावर "सकारात्मक' शेरा देत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येत्या शैक्षणिक वर्षापासून (2021-22) महाविद्यालयात शंभर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची शिफारस विद्यापीठाने राज्य सरकारकडे केली आहे. सरकार आणि नॅशनल मेडिकल कमिशन (एनएमसी) परवानगीनंतर महाविद्यालय सुरू होईल. महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयाच्या आवारात सुमारे साडेबारा एकर जागेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची योजना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी 2017मध्ये मांडली. त्यासाठी 2017-18च्या अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद केली. येत्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाचा "श्री'गणेशा करण्याचे नियोजन मोहोळ यांनी केले आहे. त्यासाठी ट्रस्टची स्थापना करून महाविद्यालयाच्या मंजुरीचा प्रस्ताव आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे पाठविला होता; मात्र महाविद्यालय उभारताना, मूळ जागा ही ट्रस्टच्या नावावर का नाही? अशी विचारणा विद्यापीठाने महापालिकेकडे केली होती. तसेच नवा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचनाही महापालिकेला केली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कार्यवाही होऊ शकली नव्हती. त्यानंतर महापालिका आणि महाविद्यालयाच्या ट्रस्टच्या माध्यमातून एकत्रित प्रस्ताव चार दिवसांपूर्वी आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे पाठविला होता. महाविद्यालय उभारणीच्या तांत्रिक बाबी तपासून पुढील कार्यवाही करावी, असे प्रस्तावात म्हटले होते. त्यावर तातडीने निर्णय घेत, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने राज्य सरकारकडे शिफारस केली आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जुन्या प्रस्तावातील आक्षेपांवर योग्य खुलासा केला असून, त्यानुसार महाविद्यालय सुरू करण्याचा प्रशासकीय पातळीवरील महत्त्वाची प्रक्रिया झाली आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या प्रशासकीय कामातील अडचणी दूर झाल्या आहेत. 
डॉ. अंजली साबणे, सहायक आरोग्यप्रमुख, महापालिका 

कोरोनासारख्या साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालयासारख्या यंत्रणेची गरज आहे. ती आता पुणेकरांसाठी उपलब्ध होईल. महाविद्यालय उभारणीची पुढील प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार आणि नॅशनल मेडिकल कमिशन (एनएमसी) पाठपुरावा केला जाईल. ज्यामुळे पुणेकरांच्या सेवेत वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे. 
- मुरलीधर मोहोळ, महापौर 

loading image
go to top