राष्ट्रवादीकडून भीमाशंकर निवडणुकीतील इच्छुकांची बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Meeting of aspirants in Bhimashankar election from NCP

राष्ट्रवादीकडून भीमाशंकर निवडणुकीतील इच्छुकांची बैठक

पारगाव - दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीचा उद्या (मंगळवार दि.५ ) शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची बैठक घेऊन प्रत्येकाशी चर्चा विनिमय करण्यात आला. कारखान्याचे संस्थापक माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल असा एकमुखी निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विष्णूकाका हिंगे पाटील यांनी दिली आहे.

भीमाशंकर साखर कारखाण्याच्या निवडणुकीत 21 जागांसाठी 102 उमेदवारी अर्ज आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जास्त इच्छुक आहेत. शिवसेना निवडणूक रिंगणात उतरली असून त्यांनीही काही जागांवर उमेदवारी अर्ज भरले आहेत. मंगळवारी माघारीचा शेवटचा दिवस असून माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे. काही अपवाद वगळता विद्यमान संचालक मंडळातील बहुतेक संचालक पुन्हा इच्छुक आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंचर येथील माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज इच्छुकांची बैठक घेण्यात आली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विष्णूकाका हिंगे पाटील ,भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, माजी अध्यक्ष देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, माजी सभापती वसंतराव भालेराव, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष अंकित जाधव यांनी इच्छुक उमेदवारांबरोबर संवाद साधला.

इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांच्या गर्दीने परिसर गजबजला होता.दरम्यान कारखान्याच्या संचालक मंडळासंदर्भात श्री .वळसे पाटील हे निर्णय घेणार असून त्यांचा निर्णय सर्वांना मान्य असेल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री. हिंगे पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी उमेदवार अर्ज भरतेवेळी माघारीचे फॉर्म पक्ष कार्यालयात जमा केले आहेत.

उद्या सकाळी दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे त्यानंतर इतर उमेदवारांची माघार घेताना कुठली अडचण येईल असे वाटत नाही. राज्यातील ताज्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत शिवसेना काय करणार याबाबत उत्सुकता राहणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली असून याबाबतचा अंतिम निर्णय माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील घेणार आहेत.

Web Title: Meeting Of Aspirants In Bhimashankar Election From Ncp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..