आणखी दोन दिवस पुणेकरांना पाऊस अनुभवता येईल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 January 2021

शहरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. पण "थर्टीफस्ट'पर्यंत पुणेकर थंडीने कुडकुडत होते. त्यानंतर आता गेल्या तीन दिवसांपासून पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे - पुण्यात नेमका कोणता ऋतू चाललाय, असा प्रश्‍न सध्याच्या वातावरणावरून पडत आहे. आधी थंडी, नंतर एखादा दिवस उन्हाचा चटका आणि आता तर चक्क पाऊस! त्यामुळे "फुल कन्फ्यूज' करणारे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, आणखी दोन दिवस पुणेकरांना पाऊस अनुभवता येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

शहरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. पण "थर्टीफस्ट'पर्यंत पुणेकर थंडीने कुडकुडत होते. त्यानंतर आता गेल्या तीन दिवसांपासून पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यात गुरुवारी दुपारनंतर तर पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावायला सुरवात केली. संध्याकाळपर्यंत पावसाच्या सरींना जोर थोडा वाढला. त्यामुळे जानेवारीमध्ये अक्षरश- छत्री घेऊन पुणेकर बाहेर पडत असल्याचे चित्र मध्य वस्तीतील पेठांमध्ये दिसत आहे. 

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाना मिळणार 'विमा कवच' तेही 50 लाख रुपयांचे​

शहराच्या उपनगरांमध्येही पावसाच्या सरींनी हजेरी लावली. हा पाऊस नेमका संध्याकाळी वाढला. त्यामुळे कार्यालयातून घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. रस्ते ओले झाल्याने दुचाकी घसरून अपघाताच्या काही  घटनाही घडल्या. गुरुवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत 3.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

हवामान अंदाज - 
पुणे शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस आकाश मुख्यत: ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे. तसेच, हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडेल, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. दुपारनंतर शहराच्या विविध भागात पावसाला सुरुवात झाली. कोथरूड, सिंहगड रस्ता, बावधन भागात पावसाच्या सरी पडल्या. 

अकरावीच्या विद्यार्थ्यांनो, 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' फेरीद्वारे होणार अॅडमिशन​

का पडतोय पाऊस? 
कर्नाटक किनारपट्टीपासून ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा तयार झाला आहे. दक्षिण, कोकण- गोवा ते दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत हा पट्टा सक्रिय आहे. त्याचा थेट परिणाम राज्यावर होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्या दिला आहे. 

हवामान खात्याचा इशारा राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडत आहे. हवामानशास्त्र विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार गुरुवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागात आणि विदर्भाच्या बऱ्याच किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्‍वर येथे 16.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: meteorological department has forecast rains in Pune for the next two days