मेट्रोच्या नव्या मार्गांवरील चाचणी पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये यशस्वी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Metro

मेट्रोची गरवारे कॉलेज ते डेक्कन मेट्रो स्थानक आणि फुगेवाडी ते दापोडी मेट्रो स्थानक दरम्यानची चाचणी सोमवारी यशस्वी झाली.

मेट्रोच्या नव्या मार्गांवरील चाचणी पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये यशस्वी

पुणे - मेट्रोची गरवारे कॉलेज ते डेक्कन मेट्रो स्थानक आणि फुगेवाडी ते दापोडी मेट्रो स्थानक दरम्यानची चाचणी सोमवारी यशस्वी झाली. शहरातील एलिव्हेटेड मेट्रो प्रकल्पाचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करणार असल्याचा दावा महामेट्रोने केला आहे. नव्या मार्गांवरील स्थानकांचे कामही तत्पूर्वी पूर्ण होणार आहे.

वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक आणि पिंपरी चिंचवड महानगपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक या दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे 6 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यानंतर पाच महिन्यांनी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी गरवारे कॉलेज चे डेक्कन जिमखाना स्थानक या दरम्यानच्या ८१० मीटरवर मेट्रोची चाचणी झाली. तसेच फुगेवाडी मेट्रो स्थानक ते दापोडी मेट्रो स्थानकादरम्यानही चाचणी यशस्वी झाली.त्यामुळे येत्या काही महिन्यांत गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशनच्या पलीकडे शिवाजीनगर न्यायालय स्थानक आणि फुगेवाडी स्थानक येथून शिवाजीनगर स्थानकापर्यंतच्या मार्गावर मेट्रोचा धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सध्या कार्यरत असलेल्या गरवारे कॉलेज मेट्रो स्थानकापासून डेक्कन मेट्रो स्थानकापर्यंत आणि परतीच्या प्रवासाला सोमवारी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी सुरुवात झाली. त्याचप्रमाणे फुगेवाडी स्थानकातून ते दापोडी मेट्रो स्थानकाकडे मेट्रो त्याच वेळेस धावली. दोन्ही गाड्यांच्या चाचणीचा वेग ताशी १५ किलोमीटर होता. आता पुढील टप्पात डेक्कन जिमखाना, संभाजी उद्यान, महापालिका भवन आणि शिवाजीनगर न्यायालय स्थानकाच्या कामावर लक्ष केंद्रीत करण्यात येईल. शहरातील एलिव्हेटेड मेट्रो प्रकल्पाचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे महामेट्रोचे महासंचालक हेमंत सोनवणे यांनी सांगितले.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले की, 'आम्ही येत्या काही महिन्यांत मेट्रोचे उर्वरित मार्ग सुरू करण्यासाठी कटिबद्ध आहोत. दोन्ही मार्गांवरील पहिल्या चाचण्या यशस्वी झाल्या असून यापुढेही चाचण्या होतील.'

प्रवाशांचा विक्रमी प्रतिसाद

स्वातंत्र्य दिनी दोन्ही शहरातील मेट्रो मार्गांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दोन्ही शहरांत एकाच दिवसांत तब्बल ८७ हजार ९३३ प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. या पूर्वी एकाच दिवशी ६७ हजार २८० प्रवाशांनी मेट्रोतून प्रास केला होता. १५ ऑगस्ट रोजी अनेक शांळांनी विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी सहली आयोजित केल्या होत्या. तसेच ज्येष्ठ नागरिक, कौटुंबिक गट, नियमित प्रवाशांनीही सोमवारी मेट्रोतून प्रवास केला.

Web Title: Metro New Route Test Success In Pune And Pimpri Chinchwad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..