शहरात मेट्रोचा तिसरा मार्ग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पुणे - हिंजवडी परिसरातील औद्योगिकरणाला चालना देण्याबरोबरच वाहतुकीची कोंडी फोडण्यास मदत करणाऱ्या पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या कामाचे भूमीपूजन उद्या (मंगळवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. शहरातील हा मेट्रोचा तिसरा मार्ग असणार आहे.

पुणे - हिंजवडी परिसरातील औद्योगिकरणाला चालना देण्याबरोबरच वाहतुकीची कोंडी फोडण्यास मदत करणाऱ्या पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या कामाचे भूमीपूजन उद्या (मंगळवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. शहरातील हा मेट्रोचा तिसरा मार्ग असणार आहे.

हिंजवडी येथील आयटी पार्कमध्ये राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय कंपन्या आहेत. हिंजवडीला दररोज ये-जा करणाऱ्यांची संख्या सुमारे दोन लाख आहे; परंतु अरुंद रस्त्यांमुळे तेथे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने या २३.३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. हा संपूर्ण मार्ग इलेव्हेटेड असणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने यापूर्वीच या प्रकल्पास हिरवा कंदील दाखविला आहे. हा प्रकल्प राबविण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने निविदा प्रक्रिया राबविली होती. ‘डीबीओटी’ तत्त्वावर टाटा-सिमेन्स या कंपनीला या प्रकल्पाचे काम देण्यात आले आहे.

येथे होणार मेट्रो स्टेशन  (मागणी केलेले जागेचे क्षेत्र)
पुणे विद्यापीठ (२२.१९ चौ. मी.), टायग्रीस कॅम्प व पुणे ग्रामीण पोलीस (४३.८५ चौ. मी.), आकाशवाणी आणि हवामान विभाग (३२६ चौ. मी.), आरबीआय (१८१ चौ. मी.), शिवाजीनगर न्यायालय पार्किंग (१८२ चौ. मी.), सेंट्रल बी रिसर्च व ट्रेनिंग सेंटर (२९० चौ. मी.), शासकीय तंत्रशिक्षण विभाग, (३०२ चौ. मी.), पोलीस भरती मैदान (२०१ चौ. मी.) सीओईपी होस्टेल (२९० चौ. मी.), कृषी विद्यापीठ (१०५ चौ. मी.), कृषी महाविद्यालय (५७२५ चौ. मी.).

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज सायंकाळी पावणेपाच वाजता बालेवाडी येथील स्टेडीयमवर या प्रकल्पाचे भूमीपूजन होत आहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदिपसिंग पुरी, पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित राहणार आहेत. 

प्रकल्पाची वैशिष्ट्ये
 हिंजवडी ते शिवाजीनगर - २३ किलोमीटर मार्ग 
 एकूण स्थानके - २३
 प्रकल्पाची एकूण किंमत - ३ हजार ३१३ कोटी रुपये
 भूसंपादनासाठी खर्च - १ हजार ८११ कोटी
 केंद्र सरकार - २० टक्के निधी
 राज्य सरकार - २० टक्के निधी जमिनीच्या स्वरूपात
 खासगी कंपनी देणार - ६० टक्के निधी
 सार्वजनिक - खासगी भागीदारी - पहिला प्रकल्प
 प्रकल्पाचे काम - तीन वर्षांत पूर्ण करणार 
 दोन मेट्रो धावणार (आठ डबे असलेल्या)
 एकावेळी प्रवास - ३३ हजार प्रवासी
 रोजगार निर्मिती - एक हजार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Metro Third Route