
पुणे - वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि मेट्रोचा प्रवास सुकर करण्यासाठी पौड रस्त्यावर आणखी एक दुमजली उड्डाणपूल होणार आहे. कोथरूडमधील कचरा डेपो ते चांदणी चौक या दरम्यान हा दुमजली पूल प्रस्तावित आहे. पुलाचा पहिला मजला वाहतुकीसाठी आहे, तर त्यावर मेट्रो मार्ग असणार आहे. तर, या पुलासाठी येणारा खर्च महापालिका उचलणार आहे. नळस्टॉप, गणेशखिंड रस्त्यापाठोपाठ पौड रस्त्यावर तिसरा दुमजली उड्डाणपूल साकारणार आहे.
शहरामध्ये कोकण, सातारा, वाकड, हिंजवडी व मुंबईहून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना चांदणी चौकातून कोथरूडमार्गे पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये प्रवेश करता येतो. त्यामुळे सकाळी व सायंकाळी ऐन रहदारीच्यावेळी वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे.
दरम्यान, यापूर्वी कर्वे रस्त्यावर नळस्टॉप येथे अटलबिहारी वाजपेयी दुमजली उड्डाणपुलाचा पहिला प्रयोग पुण्यात झाला. त्यापाठोपाठ आता गणेशखिंड रस्त्यावर रेंजहिल्स कॉर्नर ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंद ऋर्षी महाराज चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. त्यानंतर आता कोथरूडमधील कचरा डेपो-टीव्हीएस शोरूम ते लोहिया आयटी पार्कपर्यंत होणार आहे.
महामेट्रोने त्याबाबतचा आराखडा पुणे महापालिकेला सादर केला आहे. त्यानुसार, महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाकडून संबंधित प्रस्तावाचा सविस्तर अभ्यास करून तसेच योग्य बदल सुचवून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. संबंधित दुमजली पुलामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होण्याची शक्यता आहे.
म्हणून दुमजली पुलाची गरज
कोथरूड डेपो परिसर, नळस्टॉप, लोहिया आयटी पार्क या ठिकाणांवर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम असतो. अवघ्या दीड किलोमीटरच्या रस्त्यावर छोटे-छोटे चौक, ठिकठिकाणी सिग्नल, रस्त्याभोवती वाढलेले नागरिकरण व वर्दळीमुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडते. त्यामुळे संबंधित मार्गावर दुमजली पूल करण्याची मागणी केली जात होती.
त्यानुसार, संबंधित पुलाची उभारणी होणार आहे. वनाज ते रामवाडी मार्गाचा विस्तार चांदणी चौकापर्यंत होणार आहे, त्यामुळे वनाज ते चांदणी चौक मेट्रो मार्गाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला असून हा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे मेट्रोचा मार्ग तयार करतानाच, त्यामध्ये वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपुलाची असणारी गरज पूर्ण करण्यात येणार आहे.
'पौड रस्त्यावरील प्रस्तावित दुमजली उड्डाणपुलाचा आराखडा महामेट्रोने बनविला आहे. त्यांनी महापालिकेला संबंधित आराखडा सादर केला आहे. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दुमजली उड्डाणपूल उपयुक्त ठरू शकतो. संबंधित आराखड्याचा महापालिका अभ्यास करणार आहे. त्यानंतर अपेक्षित बदल सुचवून पुढील कार्यवाही केली जाईल. या पुलासाठी येणारा खर्च महापालिकेतर्फे केला जाणार आहे.'
- युवराज देशमुख, मुख्य अभियंता, विशेष प्रकल्प विभाग, महापालिका.
* उड्डाणपूल एकूण लांबी - ७१५ मीटर
* उड्डाणपुलाची एकूण रुंदी - १४ मीटर (प्रत्येकी २- २ लेन)
* या प्रकल्पासाठी येणारा अंदाजे खर्च - ९० कोटी रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.