लोहमार्ग टाकण्यास लवकरच सुरवात

ज्ञानेश्‍वर बिजले 
शनिवार, 8 डिसेंबर 2018

पिंपरी - शहरातील मेट्रोच्या व्हायाडक्‍टच्या कामाचा वेग वाढविण्यासाठी खराळवाडी येथे चौथा गर्डर लाँचर बसविण्यात येत असून, जानेवारीत त्याचे काम सुरू होईल. दोन किलोमीटर अंतरात व्हायाडक्‍टचे काम झाल्यामुळे मेट्रोच्या लोहमार्ग टाकण्याच्या कामालाही लवकरच प्रारंभ होईल. 

पिंपरी - शहरातील मेट्रोच्या व्हायाडक्‍टच्या कामाचा वेग वाढविण्यासाठी खराळवाडी येथे चौथा गर्डर लाँचर बसविण्यात येत असून, जानेवारीत त्याचे काम सुरू होईल. दोन किलोमीटर अंतरात व्हायाडक्‍टचे काम झाल्यामुळे मेट्रोच्या लोहमार्ग टाकण्याच्या कामालाही लवकरच प्रारंभ होईल. 

संरक्षण दलाकडून जागा ताब्यात मिळण्यास विलंब होत असल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते स्वारगेट या मेट्रो मार्गावर पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोच्या कामाला प्राधान्य देण्यात आले. शहरातील सहा स्थानके बांधण्याची कामेही प्रगतिपथावर आहेत. मेट्रो मुख्यत्वे मुख्य रस्त्याच्या दुभाजकावरून मार्गस्थ होत आहे. आंबेडकर चौकात ग्रेडसेपरेटर असल्यामुळे ती मुख्य मार्गावरून सेवारस्त्याकडे वळविण्यात आली आहे. तेथून महापालिका भवनापासून संत मदर तेरेसा पुलापर्यंत ती सेवा रस्त्यावरून जाणार आहे. त्या मार्गावरील खांब उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. चौथ्या गर्डर लाँचरच्या साह्याने खराळवाडीपासून संत मदर तेरेसा पुलापर्यंत व्हायाडक्‍ट उभारण्यात येईल. यादरम्यान सुमारे पन्नास खांब आहेत.

वल्लभनगर एसटी स्थानकासमोर पुणे-मुंबई रस्त्यावर संत तुकारामनगर मेट्रो स्थानकाच्या दहा खांबांवर पिलर आर्मस बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. कासारवाडी व फुगेवाडी मेट्रो स्थानकांसाठीही पिलर आर्मस बसविण्याची प्राथमिक तयारी सुरू झाली आहे. अहल्यादेवी होळकर चौकाजवळ मेट्रो स्थानकासाठी आठ खांबांचे फाउंडेशन झाले आहे. नाशिक फाटा उड्डाण पुलाजवळ कासारवाडी रेल्वेस्थानकासमोर मेट्रो स्थानक उभारण्यात येत असून, त्याच्या तीन खांबांचे फाउंडेशन झाले आहे.

महामेट्रोचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक गौतम बिऱ्हाडे म्हणाले, ‘‘महापालिका भवन आणि नाशिक फाटा येथील कामे ही आव्हानात्मक आहेत. तेथील वाहतूक सुरळीत सुरू ठेवून आम्ही मेट्रोची कामे करीत आहोत. वाहतूक पोलिसांशी समन्वय ठेवून तेथील कामे सुरू आहेत. हॅरिस पुलाजवळील नदीपात्रामध्ये खांबांसाठी पाया घेण्यात येत आहे.’’

फुगेवाडी ते महापालिका भवन यादरम्यान मेट्रोचे काम प्राधान्याने करीत आहोत. तीन गर्डर लाँचरच्या साह्याने व्हायाडक्‍टसाठी स्पॅन बसविण्यात येत आहेत. त्यासाठी पिलर कॅप बसविण्याची पूर्वतयारी नियोजनबद्ध रीतीने सुरू आहे. चार गर्डर लाँचर बसविल्यानंतर दरमहा अठरा ते वीस स्पॅन पूर्ण होतील. तीन स्थानकासाठी पिलर आर्मस बसविण्याचे काम हाती घेतले आहे.
- गौतम बिऱ्हाडे,  मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, महामेट्रो

Web Title: Metro viaduct work in PCMC city