esakal | मेट्रो आणखी २९ किलोमीटर विस्तारणार
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे मेट्रो

मेट्रो आणखी २९ किलोमीटर विस्तारणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिवाजीनगर न्यायालय (Court) ते लोणी काळभोर दरम्यान १९.७४ किलोमीटर, हडसपर बस डेपो ते सासवड रेल्वे स्टेशन ५.६१ किलोमीटर आणि स्वारगेट ते रेसकोर्स ३.७० किलोमीटर, अशा एकूण सुमारे २९ .१४ किलोमीटर लांबीच्या तीन मेट्रो मार्गांचे अंतिम अहवाल दिल्ली मेट्रोकडून (Pune Metro) पीएमआरडीएला सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे पीएमआरडीएकडून सुमारे ५२ किलोमीटर लांबीच्या मार्गांवर मेट्रोचे जाळे उभारण्यात येणार आहे. (Metro will extend another 29 km)

पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रोचा प्रकल्प हाती घेतला आहे. शिवाजीनगरपासून ही मेट्रो हडपसर येथे नेण्याची मागणी होत होती. हडपसर परिसरातील लोकसंख्या मोठी आहे. या भागातून अनेक नागरिक नोकरीनिमित्त शहराच्या मध्यवर्ती भागासह हिंजवडीपर्यंत प्रवास करतात. त्यामुळे हिंजवडी-शिवाजीनगर-हडपसर-फुरसुंगी, असा मेट्रो मार्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर ते फुरसुंगी दरम्यान असलेला मेट्रो मार्ग लोणीकाळभोरपर्यंत वाढविण्यात यावा, अशा सूचना दिलेल्या होत्या. त्यामुळे या मार्गावरील मेट्रोचा सुधारित अहवाल तातडीने सादर करावा, अशा सूचना पीएमआरडीएने दिल्ली मेट्रोला दिल्या होत्या.

हेही वाचा: डोंगरांचा विध्वंस थांबवा अन्यथा आणखी मोठ्या घटना घडतील - माधव गाडगीळ

दिल्ली मेट्रोने या संदर्भातील अंतिम अहवाल पीएमआरडीएला नुकताच सादर केला आहे. लोणी काळभोरपर्यंत मार्ग प्रस्तावित करताना त्याला हडसपर ते सासवड रेल्वे स्टेशन आणि स्वारगेट ते रेसकोर्स, असे दोन कनेटीव्ही देखील दिल्या आहेत. त्यामुळे स्वारगेटवरून लोणीकाळभोर आणि हडपसर, तर शिवाजीनगर येथून लोणीकाळभोर आणि सासवड दरम्यान मेट्रोने प्रवास करणे शक्य होणार आहे.

मार्गांवर २६ स्टेशन

शिवाजीनगर कोर्ट ते लोणीकाळभोर या मार्गावर १९, हडसपर बस डेपो ते सासवड रेल्वे स्टेशन या मार्गावर ४ आणि स्वारगेट ते रेसकोर्स या मार्गावर ३, असे असे मिळून २६ स्टेशन असणार आहेत. हे सर्व मार्ग इलेव्हेटेड असणार आहे. या मार्गावर हा मार्ग उभारण्यासाठी अंदाजे साडेसात हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

हिंजवडी ते शेवाळवाडी मार्ग

हिंजवडी ते शिवाजीनगर न्यायालय हा २३ किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आहे. ही मेट्रो शिवाजीनगर येथे महामेट्रोला जोडली जाणार आहे. शिवाजीनगर ते लोणीकाळभोर हा सुमारे वीस किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग होणार आहे. त्यामुळे आता हिंजवडी ते शेवाळवाडी, असा मेट्रो सुमारे ४३ किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग होणार आहे.

शिवाजीनगर कोर्ट ते लोणीकाळभोर, स्वारगेट ते रेसकोर्स आणि हडपसर बस डेपो ते सासवड रेल्वे स्टेशन दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाचा अंतिम अहवाल दिल्ली मेट्रोने पीएमआरडीएला सादर केला आहे. तो मान्यतेसाठी पुणे महानगर नियोजन समितीकडे पाठविण्यात येणार आहे. त्यांनी मान्यता दिल्यानंतर तो राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे.

-विवेक खरवडकर,

महानगर नियोजनकार पीएमआरडीए

loading image
go to top