मेट्रो धावणार शेवाळेवाडीपर्यंत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

शिवाजीनगर न्यायालय ते फुरसुंगी येथील सुलभ गार्डनऐवजी शेवाळेवाडीपर्यंत मेट्रो मार्ग वाढविण्याचा निर्णय सोमवारी मुंबईतील बैठकीत घेतला.

पुणे- शिवाजीनगर न्यायालय ते फुरसुंगी येथील सुलभ गार्डनऐवजी शेवाळेवाडीपर्यंत मेट्रो मार्ग वाढविण्याचा निर्णय सोमवारी मुंबईतील बैठकीत घेतला. त्यासाठी दिल्ली मेट्रोचा अहवाल सुधारित करून सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी ‘पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांना दिल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पवार यांनी सोमवारी मुंबई येथे ‘पीएमआरडीए’च्या सर्व प्रकल्पांची आढावा बैठक घेतली. यात शिवाजीनगर ते फुरसुंगी येथील सुलभ गार्डनपर्यंत दर्शविण्यात आलेला मेट्रो मार्ग शेवाळेवाडीपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. दिल्ली मेट्रोने यापूर्वी फुरसुंगीपर्यंत सादर केलेला अहवाल सुधारित करून तो सादर करावा, अशी सूचना केली. शेवाळेवाडी येथे महापालिकेची जकातनाक्‍याची जागा आहे. मेट्रो कारशेड उभारण्यासाठी त्या जागेचा उपयोग होऊ शकतो, असेही पवार यांनी अधिकाऱ्यांना सूचविले. 

शिवाजीनगर न्यायालय ते फुरसुंगी दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे सर्वेक्षण करण्याचे काम ‘पीएमआरडी’ने दिल्ली मेट्रोला दिले होते. दिल्ली मेट्रोने या मार्गाचे सर्वेक्षण करून मध्यंतरी प्राधिकरणाकडे यासंदर्भातील अहवाल दिला आहे. त्यामध्ये १५.५३ किलोमीटर लांबीचा हा मार्ग दर्शविण्यात आला आहे. तो संपूर्ण एलिव्हेटेड असणार आहे. या मार्गावर एकूण पंधरा स्थानके असणार आहेत. हा मार्ग उभारण्यासाठी अंदाजे साडेचार हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

राज्य सरकारची जमीन मिळणार
पुणे, पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे जिल्ह्यातील ९ तालुक्‍यांचा समावेश असलेल्या ‘पीएमआरडीए’चे कार्य पुणे जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्ग क्र. ३ साठी राज्य सरकारच्या मालकीची १५ हजार चौरस मीटर जागा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

असा असेल मार्ग 
शिवाजीनगर (कोर्ट) - रेल्वे कॉलनी - जिल्हाधिकारी कार्यालय-एमजी रोड-फॅशन स्ट्रीट-मम्हादेवी चौक-रेसकोर्स-काळूबाई चौक-वैदूवाडी-हडपसर फाटा-हडपसर बस डेपो-ग्लायडिंग सेंटर-फुरसुंगी आयटी पार्क-सुलभ गार्डन असा मार्ग होता. तो आता सुलभ गार्डन येथून शेवाळेवाडीपर्यंत नेणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Metro will run up to Shewalwadi