esakal | गरवारे कॉलेजपर्यंत मेट्रो २५ जुलै दरम्यान धावणार
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रो सफारीसाठी जुलै २०२० चा मुहूर्त!

गरवारे कॉलेजपर्यंत मेट्रो २५ जुलै दरम्यान धावणार

sakal_logo
By
शरयू काकडे

पुणे : पुणेकरांसाठी कुतूहलाची ठरलेली आणि कोथरूडमध्ये वनाज- आयडियल कॉलनी दरम्यान धावलेली मेट्रो २५ जुलैच्या दरम्यान गरवारे महाविद्यालयापर्यंत धावणार असल्याचे महामेट्रोच्या प्रशासकीय सूत्रांनी शुक्रवारी स्पष्ट केले. या चाचण्या वारंवार होणार असल्याने मेट्रोची छबी कोथरूडकरांना आता वरचेवर पहायला मिळेल.

वनाज - रामवाडी मार्गासाठी मेट्रोचे काम सुरू आहे. सुमारे १५ किलोमीटरची मेट्रो संपूर्णतः एलिव्हेटेड (रस्त्यावर खांब उभारून त्या वरून धावणारी) पद्धतीची आहे. पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत संपूर्ण मार्गाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. तर, पिंपरी - स्वारगेट मार्गावरही १६ किलोमीटर अंतराच्या मेट्रोचे काम जोरात सुरू आहे. या दोन्ही मार्गांवर पहिल्या टप्प्यात अनुक्रमे वनाज- गरवारे महाविद्यालयादरम्यान तर, पिंपरी ते फुगेवाडी दरम्यान मेट्रो अल्पावधीत धावणार आहे. पिंपरीत पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे उदघाटन १५ ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे तर पुण्यातील मेट्रो डिसेंबर अखेर धावेल, असा अंदाज आहे. दोन्ही मार्गांवर मेट्रोच्या स्थानकांचे काम वेगात सुरू आहे, अशी माहिती महामेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी दिली.

हेही वाचा: खेळ कुणाला दैवाचा कळला...

कोथरूडमधील मेट्रोचे यार्ड ते आयडियल कॉलनी दरम्यानच्या तीन किलोमीटरवर मेट्रोची चाचणी गुरुवारी रात्री झाली. अचानक ही चाचणी झाल्यामुळे नागरिकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. अनेकांनी इमारतींमधून मेट्रोचा व्हिडिओ मोबाईलवर काढला. अवघ्या काही मिनिटांत हा व्हिडिओ शहरभर व्हायरल झाला. मेट्रोचा ट्रॅक, सिग्नलिंग, व्हाय डक्ट, कोच आदींची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली, असेही गाडगीळ यांनी स्पष्ट केले. आता स्थानकांची कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर असेल. दोन ते सहा महिन्यांत स्थानकांची कामे पूर्ण होतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मेट्रो प्रवाशांसाठी खुली होणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पांसाठी सुमारे ११ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. केंद्र, राज्य आणि महापालिका यांच्या माध्यमातून सुमारे ५० टक्के निधी उभारण्यात आला असून, उर्वरित खर्च युरोपियन बॅंकेकडून कर्ज स्वरूपात उभारण्यात आला आहे.

loading image