esakal | खेळ कुणाला दैवाचा कळला...
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

खेळ कुणाला दैवाचा कळला...

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

‘नाशिकवरून माझे आई-बाबा येणार आहेत. त्यांना आणायला पाच वाजता जाताल का?,’ प्राचीने योगेशला विचारले. ‘काऽ ऽय? तुझे आई-बाबा येणार आहेत?’ असं म्हणत तो जोरात किंचाळला. नंतर झालेली चूक लक्षात येऊन, त्याने जीभ चावली व मधाळ स्वर लावत ‘‘जाऽ ऽनू, तुझे आई-बाबा किती दिवसांनी येत आहेत ना? इथून त्यांना गेलेले तब्बल १५ दिवस झाले होते आणि आपल्याकडे फक्त दोनच महिने राहिले होते.’ योगेशने म्हटले. ‘हो ना. मागच्यावेळी लॉकडाउनमुळे त्यांची व्यवस्थित सरबराई करता आली नव्हती. तुम्ही आता महिनाभर सुटीच टाका.’ प्राचीने लाडीकपणे म्हटले. यावर योगेशचा चेहरा साफ पडला. (SL Khutwad Writes 10th July 2021)

‘अगं आज मला कामाचा प्रचंड ताण आहे. मला श्वास घ्यायलाही सवड मिळणार नाही. त्यामुळे मला शिवाजीनगरला जाता येणार नाही.’ योगेशने म्हटले. मात्र, प्राचीला याचा राग आला. ‘तुमचं हे नेहमीचंच आहे. माझे आई-बाबा आले की तुमचा कामाचा ताण कसा काय वाढतो.?’ असं म्हणून ती फुरंगटून बसली. ‘अगं मी खोटे बोलत नाही. त्यांना रिक्षाने किंवा टॅक्सीने यायला सांग. वाटल्यास आजच्या दिवस तू जा.’ असे योगेशने म्हटले. मात्र, प्राचीचा रुसवा काही गेला नाही. ‘माझी व माझ्या आई-बाबांची तुम्हाला काळजीच नाही,’ असे म्हणत प्राची स्फुंदत रडू लागली.

हेही वाचा: एआयसीटीई आणि डीआरडीओच्या सहकार्याने एम.टेक अभ्यासक्रम सुरू

योगेशने तिची मनधरणी करायचा प्रयत्न केला; पण उपयोग झाला नाही. शेवटी डबा न घेताच तो ऑफिसला गेला. सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्याची महत्त्वाची दोन कामे अचानक रद्द झाल्याने त्याला रिकामा वेळ मिळाला. ‘मी आई-बाबांना आणायला शिवाजीनगरला जात आहे’, हे सांगण्यासाठी त्याने प्राचीला फोन केला. मात्र, अजूनही ती घुश्यातच असल्याने तिने फोन उचलला नाही. दहा-बारा वेळा फोन करूनही उपयोग न झाल्याने तो कार घेऊन थेट शिवाजीनगरला पोचला. तोपर्यंत सव्वापाच वाजून गेले होते. त्याने प्रत्येक फलाटावर जाऊन आई-बाबांचा शोध घेतला. पण, ते कोठे आढळले नाहीत.

‘पुणे-नाशिक गाडीला कोठे अपघात झाला नाही ना’, याचीही त्याने नियंत्रण कक्षात चौकशी केली. अधून-मधून तो प्राचीला फोन करत होता. पण, ती उचलत नसल्याने तो वैतागून गेला. शेवटी साडेसहाच्या सुमारास तो घरी जायला निघाला. तेवढ्यात सोसायटीतील सुनंदा वहिनी हातात दोन मोठमोठ्या बॅगा घेऊन रिक्षा शोधत असल्याचे त्याला दिसले. ‘वहिनी, तुम्ही इकडे कोठे?’ योगेशने विचारले. ‘अहो माहेरी मंचरला गेले होते. तिकडून येते आहे,’ असे त्यांनी म्हटले. ‘चला मीदेखील घरीच निघालो आहे. तुम्हाला सोडतो.’’ योगेशने असं म्हटल्यावर सुनंदा वहिनींनी फारच आढेवेढे घेतले. मात्र, योगेशने आग्रह केल्याने त्या तयार झाल्या. सव्वासातला ते दोघेही सोसायटीत पोचले. या दोघांना गाडीतून उतरताना प्राचीने गॅलरीतून पाहिले. गाडीतून वहिनींच्या बॅगा योगेश काढत असल्याचे पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. योगेश घरी पोचल्यावर तिने जमदग्नीचा अवतार धारण केला. शेजारी आई-बाबा बसले आहेत, याचंही तिला भान राहिलं नाही.

‘माझ्या आई-बाबांना शिवाजीनगरहून आणायला तुम्हाला वेळ नाही आणि त्या बयेला मंचरहून घेऊन आलाय. कुठं फेडाल ही पापं?’, असं म्हणत ती त्याच्या अंगावर धावून गेली अन् योगेश मात्र ‘अगं... अगं...’चा मंत्र म्हणत बसला.

loading image