स्थलांतरित मुलांच्या दारी फिरती शाळा (व्हिडिओ)

आशा साळवी
रविवार, 2 डिसेंबर 2018

पिंपरी - उद्योगनगरीत रोजगाराच्या शोधात आलेल्या स्थलांतरित कामगारांच्या मुलांची शिक्षणाची आबाळ होऊ नये, यासाठी डोअर स्टेप स्कूल संस्थेने शहरात फिरत्या शाळा सुरू केल्या आहेत. झोपडपट्टी, वाड्या-वस्त्यांवर जाऊन अशी मुले शोधून त्यांना शिकविण्याचे काम सुरू आहे. 

पिंपरी - उद्योगनगरीत रोजगाराच्या शोधात आलेल्या स्थलांतरित कामगारांच्या मुलांची शिक्षणाची आबाळ होऊ नये, यासाठी डोअर स्टेप स्कूल संस्थेने शहरात फिरत्या शाळा सुरू केल्या आहेत. झोपडपट्टी, वाड्या-वस्त्यांवर जाऊन अशी मुले शोधून त्यांना शिकविण्याचे काम सुरू आहे. 

रोजगाराच्या शोधात अनेकजण गाव सोडून आलेली आहेत. अशा स्थलांतरित कुटुंबांनी पाल ठोकून, रस्त्याच्या कडेला, वाड्या-वस्त्या, बांधकामाच्या ठिकाणी वस्ती केली. त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहतात. त्यांना शाळेची गोडी लावून शाळेत दाखल करण्याचे आणि शिकविण्याचे काम दि सोसायटी फॉर डोअर स्टेप स्कूल करत आहे.  

‘झोपडी तिथे बालवाडी, मूल तिथे शाळा, चाकावरती पुस्तक मेळा, आली आली दारी शाळा’ असे त्यांचे ब्रीद वाक्‍य आहे. तीन ते १४ वयोगटातील ज्या मुलांना शाळेत जाणे शक्‍य नसते अशांसाठी ही फिरती शाळा आहे. फिरत्या शाळेमुळे पांजरपोळ, फुगेवस्ती, रावेत, शिंदेवस्ती, वाल्हेकरवाडी, नेहरूनगर, गायवस्ती-मोशी, भीमशक्ती नगर, भोसरी येथील मुलांची सोय झाली आहे. स्थलांतरित मुलांसाठी संस्थेने तीन बसमधून शिक्षणाची सोय केली. 

समाजातील असमानता, बेरोजगारी, गरिबी अशा अनेक समस्यांवर शिक्षण हा एकमेव उपाय असल्याने संस्थापिका रजनी परांजपे यांनी डोअर स्टेप स्कूलची स्थापना केली. विशेषतः स्थलांतरित मजुरांच्या मुलांची समस्या लक्षात घेऊन शाळाच त्यांच्या दारी नेण्याचा प्रयोग संस्थेने केला आहे. 

या मुलांच्या एका ठिकाणच्या वास्तव्याचा विचार करून शिक्षणपद्धतीची आखणी केली आहे. सुमारे १२० दिवसांची ही प्रक्रिया असून त्यात वाचन प्राथमिक पायरी असते. यासाठी मराठी मुळाक्षरे, गणित यांचे शिक्षण मुलांना दिले जाते. एका बसमध्ये दोन शिक्षिका आहेत. मुलांना शाळेत जाण्यायोग्य पूर्वशिक्षण दिले जाते. त्यानंतर शक्‍य असल्यास त्यांना जवळच्या शाळेत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत भरती केले जातात.

शिक्षणाची माहिती देण्यापासून ते आरटीईअंतर्गत मुलांचे प्रवेश देण्यापर्यंतची प्रक्रिया संस्थेमार्फत राबविली जाते. तीन वर्षांपासून पुढील २५ मुलांना एका वेळी शिकविण्याची बसमध्ये सोय आहे.
- वर्षा पाटील, समन्वयिका, डोअर स्टेप स्कूल

    शहरात सहा ठिकाणी भरते फिरती शाळा
    सोमवार ते शुक्रवार रोज एक तास वर्ग असतो
    रोज किमान १८० विद्यार्थ्यांची हजेरी
    एका वस्तीवर किमान २५ मुले

Web Title: Migration Child School Education