Sharad Pawar on MIM Offer| MIM च्या प्रस्तावावर शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar on MIM Offer | Sharad Pawar News

MIM च्या प्रस्तावावर शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

बारामती : कोणी कोणत्या पक्षासोबत जायचं हे ते स्वत: सांगू शकतात, ज्यांच्यासोबत जायच आहे त्या पक्षाने तरी होकार दिला पाहिजे, हा राजकीय निर्णय आहे. हा निर्णय महाराष्ट्रापुरता कुणी प्रस्तावित केला असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून अशा प्रकारचा राजकीय निर्णय राज्याला घेण्याचा अधिकार देत नाही. राज्याला या निर्णयाबाबत राष्ट्रीय समितीने स्पष्ट करे पर्यंत कोणत्याही राज्यात अशा प्रकारची भुमिका ते घेवू शकत नाहीत. त्यामुळं महाराष्ट्रात गेली दोन दिवस जो एमआयएमबाबत ज्या बातम्या येतायत. तो पक्षाचा निर्णय नाही, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त करत 'एमआयएम'सोबत जाण्याची शक्यता फेटाळली. (Sharad Pawar on MIM Offer)

हेही वाचा: यशवंत जाधव यांच्यावर कारवाईची मागणी घेऊन सोमय्या दिल्लीत

गोविंद बाग येथे पत्रकारांशी पवार बोलत होते. यावेळी पुरंदर विमानतळाबाबत पवार पुढे म्हणाले, एक जागा जवळपास निश्चित झालेली आहे. त्याला जवळपास सर्व विभागांनी मान्यता दिली आहे. त्या जागेच्या बाबत संरक्षण खात्याची काही मते आहेत. ती विमानतळाच्या बाबत दुर्लक्षित करता येत नाहीत. त्यामुळे यासंबंधीचा निर्णय घेण्याप्रत आलेली यंत्रणा सध्या थांबली आहे. राज्याच्या दृष्टीने पुण्याच्या विमानतळाचा प्रश्न लवकर मार्गी लागावा असा आमचा प्रयत्न आहे. यासाठी संरक्षणमंत्री आणि संबंधित विभागातील यंत्रणांसोबत राज्य सरकारच्या प्रतिनिधींसह बैठक घेवून निर्णय घ्यावा .हा आग्रह आम्ही दिल्लीत जाऊन करणार आहोत.

हेही वाचा: मलिकांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आजही आक्रमक होण्याची शक्यता

यापूर्वी एकदा झालेल्या बैठकीत मान्यता मिळाली. पण सरंक्षण खात्याने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याला राज्य सरकारकडून या विभागात काम करणाऱ्या यंत्रणेकडून उत्तर दिले जाईल असे पवार म्हणाले.

'काश्मिर फाईल्स'बाबत बोलताना पवार म्हणाले, देश एका विचाराने चाललेला आहे.. समाजातील सर्व घटक एकत्र आहेत.मात्र समाजात पुन्हा दुरावा निर्माण होईल असं लिखाण किंवा चित्रपट टाळले पाहिजे. या चित्रपटात कळत नकळत कॉंग्रेसवर एक दोष देण्याचा प्रयत्न केला जात आहे. कॉंग्रेसकडे सत्ता असताना हे घडलं, तेच याला जबाबदार आहेत असं ध्वनित केलं जात आहे. या सर्व बाबींचा आपण सखोल विचार केला पाहिजे. ज्या कालखंडात कश्मीरमध्ये जे काही घडल्याचे दाखवलं जात आहे.

त्या कालखंडात देशाचं नेतृत्व कॉंग्रेसकडे नव्हते. त्यावेळी विश्वप्रताप सिंग यांच्याकडे होतं. याबाबत आज आवाज उठवणारे भाजपचे लोक विश्वनाथ प्रतापसिंगांच्या सरकारमध्ये सहभागी झालेले होते. त्यानंतर या सर्व काळात देशाचे गृहमंत्री जे होते तेही भाजपच्या बळावरच होते, आणि राज्यपाल राजवट होती. फारुक अब्दुल्ला सत्तेतून दूर झाले होते. त्यावेळी असणारे राज्यपाल कॉंग्रेसच्या विचारांचे नव्हते. त्यामुळं आज हा प्रश्न उचलून पुन्हा सामाजिक वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या संबध कालखंडामध्ये या सर्वाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्याच्यामध्ये हा प्रश्न उपस्थित करणारे भाजपचे घटक हे पूर्ण सहभागी होते. त्यामुळे त्यांनी आता कारण नसताना हा विषय काढला हे योग्य नसल्याचे पवार म्हणाले.

Web Title: Mim Nationalist Congress Party Sharad Pawar Imtiaz Jalee

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top