esakal | मीनाक्षी कुमकर यांच्या 'अग्निपुष्प' पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपन्न

बोलून बातमी शोधा

manjari
मीनाक्षी कुमकर यांच्या 'अग्निपुष्प' पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपन्न
sakal_logo
By
कृष्णकांत कोबल

मांजरी (पुणे) : मीनाक्षी कुमकर यांनी लिहिलेलं 'अग्निपुष्प' हे पुस्तक डाॅक्टरांसाठी संदर्भ पुस्तक म्हणून खूप उपयुक्त आहे. प्रत्येक मेडिकलच्या विद्यार्थ्यांने हे पुस्तक आवर्जून वाचावे. त्यामुळे रूग्णाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलेल," असे मत आर्म्ड फोर्स मेडिकल काॅलेजच्या डीन मेजर जनरल माधुरी कानिटकर यांनी काढले. 

मीनाक्षी कुमकर यांनी लिहिलेल्या 'अग्निपुष्प'च्या फ्लेम ऑफ द फाॅरेस्ट या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज येथील 'भारद्वाज सभागृहा'त झाले, त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून  कानिटकर बोलत होत्या. 

कानिटकर म्हणाल्या, "या पुस्तकातील वास्तव कथा वाचून मी फार प्रभावित झाले. रूग्णांच्या आजारांवर आम्ही यंत्रवत उपचार करतो. पण त्यापलीकडे माणूस म्हणून पहायला कुमकर मॅडमनी आम्हाला शिकवलं. या पुस्तकातील वास्तव कथा वाचताना वाचक अंतर्मुख होतो. त्यांनी आपल्या या लिखाणातून समाजाला जणू आरसाच दाखवला आहे."

लेखिका कुमकर  म्हणाल्या, "वंचित, व्याधिग्रस्त, संकटांशी मुकाबला करणार्‍या आणि प्रतिकूल परिस्थितीशी झुंजणाऱ्यांच्या वास्तवकथा या पुस्तकात आहेत. संशोधक, डाॅक्टर्स, शास्त्रज्ञ जे मानवी शरिरशास्राचा अभ्यास करतात त्यांना माहीत असते, सगळे कधी ना कधी या विचारापर्यंत येऊन थांबतात की मनुष्य मृत्यू पावतो यात आश्चर्य नाही, तर सर्व आजारांतून, दुर्धर व्याधींतून तो जिवंत कसा राहतो; हे खरं आश्चर्य आहे. परंतु, या भेडसवणाऱ्या प्रश्नांना उत्तर म्हणजे जोपर्यंत समाजात स्नेह, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी असलेले मानवी रूपातील माणुसकीचे झरे आहेत, तोपर्यंत जीवन बहरतच राहणार.  अशा मानवी प्रेमाचे स्रोत या वास्तव कथांमध्ये जागोजागी आढळतील."

याप्रसंगी कथानायिकांचं प्रतिनिधित्व करणार्‍या मनिषा पांढरे ज्यांनी संघर्षमय जीवन जगत आणि राखेतून पुनः भरारी घेऊन आयुष्य घडवलं त्यांचा सत्कार करण्यात आला. पुस्तकाच्या निर्मितीत सहाय्य करणाऱ्या कर्नल अरविंद कुशवाह, संजय दुधाणे, अनिल उपळेकर, अरूणा अष्टेकर, पूनम छत्रे,  विशाल सारडा, हर्षदा देसाई, अरित्रो राय यांचा सत्कार करण्यात आला.  

प्रयास क्लबचे ऑफिसर इनचार्ज कर्नल रजनीश जोशी यांनी मेडिकल स्टुडंट्सनी चालवलेल्या प्रयास क्लबच्या सामाजिक,  वैद्यकीय कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कॅडेट अरित्रो राय यांनी केले. हर्षदा देसाई यांनी 'स्वागत गीत' म्हटले. कम्युनिटी मेडिसिनच्या विभाग प्रमुख एअर कमोडर रेणुका कुंटे यांनी उपस्थितांचे स्वागत व लेखिकेचा परिचय करून दिला.