पुणेकरांनो, चार दिवसांत किमान तापमान घटणार; स्वेटर, कानटोप्या ठेवा सज्ज

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 January 2021

पुणे शहर आणि परिसरात सोमवारी (ता. १८) आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा १६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरेल. त्यानंतर पुढील चार दिवसांमध्ये हवामान कोरडे राहील.

पुणे - ढगाळ वातावरण, पाऊस यामुळे पळालेली थंडी पुढील चार दिवसांमध्ये पुन्हा परत येईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला. त्यामुळे पुणेकरांनो, स्वेटर, उबदार कपडे पुन्हा आपल्याजवळ ठेवा. 

पुण्यात रविवारी दिवसभर आकाश अंशतः ढगाळ होते. संध्याकाळी पूर्व पुण्यात ढगांनी गर्दी केली होती. त्यामुळे संध्याकाळी पाच वाजल्यानंतर पावसाळी वातावरण झाले होते. दुपारपर्यंत आकाश अंशतः ढगाळ असल्याने कमाल तापमान २.५ अंश सेल्सिअसने वाढून ३२.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. किमान तापमान ५.७ अंश सेल्सिअसने वाढले. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमानाचा पारा १६.७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला होता. त्यामुळे पहाटे गारठा जाणवला नाही.

पुणे शहर आणि परिसरात सोमवारी (ता. १८) आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा १६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरेल. त्यानंतर पुढील चार दिवसांमध्ये हवामान कोरडे राहील. त्याचा थेट परिणाम हवेतील गारठा वाढण्यात होणार आहे. किमान  तापमानाचा पारा ११ ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल.     

मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या ईशान्य भागात आणि सौराष्ट्र परिसरात चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्‍यता आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे. यामुळे राज्यातील काही भागांत अधूनमधून ढगाळ वातावरण होत आहे. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

विदर्भाच्या काही भागात चांगलीच थंडी आहे. राज्यात सर्वांत कमी किमान  तापमान गोंदिया येथे ११.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

राज्यात हवामान कोरडे झाल्याने मागील तीन ते चार दिवसांपूर्वी किमान तापमानाचा पारा जवळपास सहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. मात्र हा पारा पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे राज्यातील थंडी कमी-अधिक स्वरूपात असून, किमान तापमानातही चढ-उतार असल्याची स्थिती आहे. 

अकरावीला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनो, दुसऱ्या संवर्गातील ऍडमिशनसाठी उद्यापर्यंत मुदत​

अरबी समुद्राच्या दक्षिण भागात आणि हिंदी महासागर परिसरात चक्रीय वाऱ्यांसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. तसेच तमिळनाडू, पाँडिचेरी आणि कराईकल, केरळ आणि माहे व परिसर व आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि यानाम, रायलसीमा, कर्नाटकाचा दक्षिण भारतात मंगळवारी (ता. १९) पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण आहे. यामुळे राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहे. 

विदर्भात किमान  तापमानात घट
कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात थंडी काहीशी कमी झाली आहे. यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे, तर राज्यात ११ ते २० अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान नोंदविले गेले आहे. विदर्भाच्या गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा भागात थंडी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minimum temperature will drop nest four days