

अपहृत तीनपैकी दोन ‘अल्पवयीन’ सापडल्या
सलगर वस्ती पोलिसांची कामगिरी; तिसरी बॉयफ्रेंडसोबत, शोध सुरू
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २५ : सलगर वस्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील न्यू धोंडिबा वस्तीतील साडेपंधरा वर्षीय मुलीसोबत तिच्या ओळखीच्या दोन साडेचौदा वर्षीय मुली देखील १९ ऑक्टोबरला बेपत्ता झाल्या होत्या. यातील एक अल्पवयीन मुलगी पोलिस शोध घेत असल्याने स्वत:हून परतली. बॉयफ्रेंडसोबत सांगलीतील विटा येथे गेलेल्या दुसऱ्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी शोधून आणले. पण, साडेपंधरा वर्षीय मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत पुण्यातच असून पोलिसांना ती अजून सापडलेली नाही.
नवरात्रोत्सवात एकाच गल्लीतील तीन अल्पवयीन मुली दररोज सकाळी सहा वाजता श्री रूपाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी येत होत्या. आठ दिवस दररोज जायच्या आणि घरी यायच्या. त्यांची वेळ फिक्स होती. पण, १९ ऑक्टोबरला त्या घरी आल्याच नाहीत. दुपारी रेल्वेने त्या तिघीही पुण्याला गेल्या. यातील साडेपंधरा वर्षीय मुलीची ओळख पुण्यातील तरुणासोबत इन्स्टाग्रामवरून झाली होती. दुसरीची पिंपरी चिंचवड परिसरातील तरुणासोबत अशीच ओळख झाली होती. तिसऱ्या अल्पवयीन मुलीचे पुण्यात कोणीच ओळखीचे नव्हते, पण तिघीही एकत्रित पुण्याला गेल्या होत्या. त्यातील साडेपंधरा वर्षीय मुलगी त्या तरुणासोबत एकटी गेली. दुसऱ्या दोघी एकत्रित गेल्या. पिंपरी चिंचवड येथील तरुणासोबत त्या सांगलीतील विटा येथे गेल्या. तेथे तरुणाच्या नातेवाइकांकडे एक दिवस थांबल्या. तेथून तो तरुण व अल्पवयीन मुलगी दुसरीकडे गेले आणि एकटीच राहिलेली तिसरी मुलगी दोन दिवसांनी कराडवरून एसटी बसने सोलापूरला आली. त्यानंतर तिच्या माहितीवरून पोलिसांनी दुसरीलाही शोधून काढले. तो तरुण मात्र पोलिसांना सापडला नाही. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार त्या तरुणाचा शोध घेत आहेत. यातील अल्पवयीन मुलींची दोन दिवसांत वैद्यकीय तपासणी होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
---
चौकट
दसऱ्याला आलेली विवाहिता
मुलासोबत मुंबईला पसार; पण...
सलगर वस्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका तरुणीचा तीन महिन्यांपूर्वी आई-वडिलांनी इंदापूर येथील नात्यातील तरुणासोबत लावून दिला. दसऱ्याच्या निमित्ताने २० वर्षीय विवाहिता माहेरी आली होती. १९ ऑक्टोबरला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ती विवाहिता घरासमोरील २४ वर्षीय तरुणाला घेऊन खासगी ट्रॅव्हल्सने पुण्याला गेली. आपण ‘नई जिंदगी’ सुरू करू, म्हणून तेथून ते दोघेही मुंबईत गेले. पोलिसांनी तरुणाच्या कुटुंबीयाला बोलावून घेऊन तरुणाची माहिती काढली आणि दोघांनाही मुंबईतून सोलापुरात आणले. तरुणीने इन्स्टाग्रामवर ‘मी माझ्या मर्जीने तरुणासोबत आली आहे, आम्ही लग्न करणार आहोत, यात कोणालाही त्रास होऊ नये’, अशी पोस्ट टाकली होती. मात्र, तरुणी १६ वर्षांची असल्यापासून तो तरुण तिच्यामागे लागल्याने पोलिसांनी तरुणाविरुद्ध ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.