आमदार अशोक पवार भेटणार पालकमंत्री अजित पवार आणि गृहमंत्र्यांना, कारण...

जनार्दन दांडगे
Tuesday, 13 October 2020

लोणी काळभोर व लोणी कंद ही दोन पोलिस स्टेशन (ठाणे) पुणे शहर पोलिस आयुक्तालयात सामाविष्ठ करण्यास आमदार अशोक पवार यांचा तीव्र विरोध. 

लोणी काळभोर (पुणे) : ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत असलेली लोणी काळभोर व लोणी कंद ही दोन बडी पोलिस स्टेशन (ठाणी) पुणे शहर पोलिस आयुक्तालयात सामाविष्ठ करण्यास आमदार अशोक पवार यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. याबाबत पालकमंत्री अजित पवार व गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन, वरील दोन्ही पोलिस स्टेशन जिल्हा पोलिसांच्या अखत्यारीत रहावीत यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, फडणवीस सरकारच्या काळात लोणी काळभोर व लोणी कंद ही दोन्ही पोलिस ठाणी पुणे शहर पोलिस आयुक्तालयात सामाविष्ठ करण्याबाबत निर्णय झाला असला तरी, हा निर्णय पुर्व हवेलीमधील लोकप्रतिनिधींना पुर्णपणे अंधारात ठेऊन घेण्यात आला होता. वरील दोन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोकप्रतिनिधी व नागरीक वरील निर्णयाच्या विरोधात असल्याने, लोणी काळभोर व लोणी कंद दोन्ही पोलिस स्टेशन (ठाणी) पुणे शहर पोलिस आयुक्तालयात सामाविष्ठ करण्यास, या भागाचा आमदार या नात्याने विरोध राहणार असल्याचेही आमदार पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

जंबो कोविड सेंटरमधील तंबू अग्निरोधक 

देवेंद्र फडणवीस सरकारने तीन वर्षापुर्वी जिल्हा ग्रामीण पोलिस दलाच्या अखत्यारीत असणारी, लोणी कंद व लोणी काळभोर ही ग्रामीण पोलिस दलामधील दोन मोठी पोलिस स्टेशन (ठाणी) पुणे शहर आयुक्तालयात सामाविष्ठ करण्याचा निर्णय जाहीर केला होता. याबाबतचा आदेश होऊनही, काही तांत्रिक कारणामुळे वरील दोन्ही पोलिस ठाणी शहर पोलिस दलात सामाविष्ठ होऊ शकली नव्हती. मात्र मागील दोन दिवसांपासून शहर पोलिसांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जाऊन, हद्दवाढीबाबत चाचपणी करण्यास सुरुवात केल्याने, वरील मुद्दा चर्चेत आला आहे.

क्षमता १२०० प्रवाशांची अन्‌ प्रवास केला फक्त १५ प्रवाशांनी

दरम्यान, याबाबत आमदार अशोक पवार यांच्याशी संपर्क साधला असता, पवार यांनी वरील दोन्ही पोलिस स्टेशन (ठाणी) पुणे शहर पोलिस आयुक्तालयात सामाविष्ठ करण्यास विरोध दर्शविला आहे. याबाबत अधिक बोलताना आमदार अशोक पवार म्हणाले, लोणी काळभोर व लोणी कंद ही पुर्व हवेलीमधील दोन मोठी पोलिस ठाणी आहेत. येथील पोलिसांचा कारभार उत्तम चालू असताना व पोलिसांच्या कामगिरीबाबत नागरीकही समाधानी असताना, ही दोन्ही पोलिस ठाणी शहर पोलिस सामाविष्ठ करणे उचीत ठरणार नाही. पुर्व हवेलीमधील लोकप्रतिनिधी व नागरीकही शहर पोलिस जाण्यात नाखूश आहेत. यामुळे या भागाचा आमदार या नात्याने, वरील निर्णयास माझाही विरोधच असणार आहे. वरील दोन्ही पोलिस ठाणी ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत रहावीत यासाठी पुढील एक दोन दिवसात पालकमंत्री अजित पवार व गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेणार असून, त्यांच्याही कानावर ही बाब घालणार आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA ashok pawar opposes inclusion of loni kalbhor and loni kanda in pune city commissionerate