पिंपरी चिंचवडला एक थेंबही पाणी देणार नाही ; आमदार मोहितेंनी घेतला आक्रमक पवित्रा

राजेंद्र सांडभोर
Sunday, 20 September 2020

भामा आसखेडच्या पाणीवाटपात एक लिटरही पाणी खेड तालुक्याला राहिलेले नाही. त्यामुळे काहीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण पिंपरी चिंचवडला एक थेंबही पाणी देणार नाही, असा आक्रमक पवित्रा खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी घेतला. पाईपलाईन पूर्ण झाली. तरी धरणग्रस्तांचे प्रश्न सुटले नाहीत, तर पुण्यालाही पाणी सोडणार नाही, असे ते म्हणाले.

राजगुरुनगर (पुणे) : भामा आसखेडच्या पाणीवाटपात एक लिटरही पाणी खेड तालुक्याला राहिलेले नाही. त्यामुळे काहीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण पिंपरी चिंचवडला एक थेंबही पाणी देणार नाही, असा आक्रमक पवित्रा खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी घेतला. पाईपलाईन पूर्ण झाली. तरी धरणग्रस्तांचे प्रश्न सुटले नाहीत, तर पुण्यालाही पाणी सोडणार नाही, असे ते म्हणाले. खेड तालुक्यावर धरणे, एमआयडीसी, सेझ, रोजगार, राजकीय पदे इत्यादींबाबत सतत अन्याय झाला असून, आंबेगाव बारामतीला मिळते, ते खेड तालुक्याला का नाही? असा सवालही त्यांनी केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या वतीने, खेड तालुक्यातील बतमीदारांना आरोग्य कीट मोहिते यांच्या हस्ते वाटण्यात आले. तेव्हा त्यांनी तालुक्यातील प्रश्नांवर आपली भूमिका पत्रकारांसमोर दिलखुलासपणे मांडली. चाकण भागात औद्यगिक क्षेत्र झाले. तालुक्याच्या पूर्व भागात सेझ प्रकल्प झला. मात्र जमिनी जाऊनही स्थानिकांना रोजगार मिळत नाही. बाबा कल्याणी यांनी सेझसाठी ४ हजार एकर जमीन घेतली, पण त्यावेळी विकासाबाबत व रोजगराबाबत दिलेले एकही आश्वासन त्यांनी पाळले नाही. तालुक्याच्या विकासासाठी तालुक्याला सत्तेत वाटा दिला पाहिजे असे ते म्हणाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बाबा कल्याणींना एक टीएमसी पाणी दिले. पुणे, पिंपरी चिंचवड, पीएमारडीए इत्यादींसाठी पाणी आरक्षित करण्यात आले. मग तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि वाढत्या लोकसंख्येला पाणी कुठून आणणार? प्रस्तावित नसतानाही, चासकमान धरणाचा डावा कालवा, शिरूर तालुक्यातील न्हावरा गावाच्या पुढे ७२ किलोमीटरचा कालवा करण्यात आला. खेड तालुक्यात धरणे असून पाणी आधी शिरूर तालुक्याला आणि नंतर खेडला असा अन्याय सुरू आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्याने त्यांचा या पाण्यावर पहिला हक्क आहे. कितीही किंमत मोजावी लागली तरी मी यावर भाष्य करणार.
गेल्या पाच वर्षात तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत मोठे नुकसान झाले असून माजी आमदारांनी कुठल्याही प्रश्नाबाबत भूमिका न घेतल्याने तालुका मागे गेला आहे, असे ते म्हणाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्यांच्यावर तालुका विश्वास ठेवतो, तेही तालुक्याचा विचार करत नाहीत, असा तिरकस टोला त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार यांचे नाव न घेता लगावला. राज्यात सर्वात मोठी एमआयडीसी खेड तालुक्यात आहे. पण कामगारांकरिता कुठल्याही सोयीसुविधा किंवा आरोग्य सुविधा याठिकाणी निर्माण केल्या गेल्या नाहीत. तालुक्याकडे ज्या पद्धतीने पाहिला पाहिजे त्या पद्धतीने नेते आणि सरकारही पाहत नाही. तालुक्याला मंत्रिमंडळात स्थान मिळत नाही, अशी टीका त्यांनी केली
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Mohite said that not a single drop of water will be given to Pimpri Chinchwad