माजी मंत्री शिवतारेंना निगेटिव्ह माणूस म्हणत आमदार जगतापांचा टोला

श्रीकृष्ण नेवसे
Wednesday, 27 January 2021

निगेटिव्ह माणसाला नव्हें तर त्या भागातील शेतकऱ्यांना आपण समजून सांगू. शेतकरी नाही म्हंटले तर विमानतळ होणार नाही, अशी ग्वाही देत पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी शिवतारेंच्या टिकेला खरमरीत उत्तर दिले.

सासवड : पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा बदलण्याबाबतचा पर्याय प्रस्तावित आहे. तोपर्यंत लगेच स्वतःला इंजिनीअर म्हणवून घेणारे माजी राज्यमंत्री विजय शिवतारेंनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव घेत जनतेच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न सुरु केला. ते मुंबईत राहील्याने त्यांना विमानतळामागील झोपडपट्टी व रेडझोनच समजला. नियोजित विमानतळाचे प्रवेशद्वार हे पुरंदरमध्येच राहील आणि एकही गावठाण यात येऊ दिले जाणार नाही. अर्थात या निगेटिव्ह माणसाला नव्हें तर त्या भागातील शेतकऱ्यांना आपण समजून सांगू. शेतकरी नाही म्हंटले तर विमानतळ होणार नाही, अशी ग्वाही देत पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी शिवतारेंच्या टिकेला खरमरीत उत्तर दिले.

हे वाचा - 'तुम्हाला जिवंत सोडत नाही'; जमीन वाटपाच्या रागातून इंदापुरात महिलेचा खून!

शिवतारे यांनी नुकतीच सासवड (ता. पुरंदर) येथे पत्रकार परीषदेद्वारे विमानतळास जमिन पुरंदरची अन् प्रवेशद्वार बारामतीकडे, असे विधान करीत षडयंत्राची भिती व्यक्त केली होती. त्याचे वृत्त 'सकाळ' मध्ये (ता. 25 रोजी) प्रसिद्ध झाले. त्यानंतर संजय जगताप यांनी पत्रकार परीषद घेत जगताप म्हणाले, सह्याद्रीच्या उपरांगा पुरंदर तालुक्यात आल्या आहेत. त्याचा अडथळा न होता व लोहगाव विमानतळास अडचण न येता तांत्रिकदृष्टया भौगोलीक सोयीची जागा नव्या ठिकाणी राजुरी, रिसे, पिसे भागात सूचविली आहे. त्यास अंतिम मान्यता झाली नाही, तोच नीट माहिती घेऊन अभ्यास न करता यांचे नेहमीचे निगेटिव्ह बोलणे व रडगाणे सुरु झाले. विमानतळाभोवती रेडझोन नाही, तर फ्लाईंग झोन असतो. तो पाच किमीचा असतो व पाच मजल्यापेक्षा अधिक उंचीच्या इमारती बांधता येत नाही. शेती करण्यास अडचण नसते. काही मर्यादा आहेत, मी पुढे आणखी विस्ताराने माहिती देईल. खरे तर हे विमानतळ प्रवासी व माल वाहतुकीस अनेक दूरच्या भागासही उपयुक्त ठरणार आहे. पुरंदर व परीसरात नागरीकरणसह उद्योगधंदे वाढतील, रोजगार वाढेल. विकासाला आणखी गतीने चालना मिळेल. पारगाव परीसराप्रमाणे नव्या जागेशी संबधीत शेतकऱयांना अधिकची झळ बसू दिली जाणार नाही. इथे बारामतीचाच विकास म्हणून या मुंबईकराने कधीमधी येऊन भावना भडकवू नयेत. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

खेडच्या मोहितेंनाही सांगितले.. पुरंदरमध्ये विमानतळाच्या दोन्ही जागांना विरोध होत असेल, तर खेडला विमानतळ द्या., अशी मागणी खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी केली. याप्रश्नी जगताप म्हणाले, मोहिते यांची माझी पुण्यात नुकतीच भेट झाली. माझ्या समवेत प्रा. दिगंबर दुर्गाडेही होते. मी मोहिते यांना म्हणालो, तुम्ही काळजी करु नका, विमानतळ पुरंदरलाच होईल. 

इंजिनीअर प्रवेशद्वाराचे सांगता..विजय शिवतारे स्वतःला इंजिनीअर म्हणवून घेतात. गुंजवणी पाईपलाईसाठी निवडणुकीपूर्वी सहा फुटाचे पाईप दाखवितात, अन् प्रत्यक्षात 120 मि.मी. व्यासाचे पाईप शेतापर्यंत येणार आहेत. मग शेती किती आणि कशी भिजणार? मुळात विमानतळाप्रमाणेच गुंजवणी प्रकल्पाचाही नीट अभ्यास न करता योजना पुढे रेटली. पाण्याची गरज असलेली गावे बाजूला राहीली व गरज नसणारी काही गावे लाभक्षेत्रात घेतली आहेत. तांत्रिकदृष्ट्या व खर्चिकदृष्टया फेल योजना यांनी आखली. त्यामुळे खर्च, उपलब्ध पाणी, सिंचन क्षेत्र यांचा मेळ बसत नाही. दोनदा उपसा सिंचन करुन सर्कस केली आहे. आपण जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना गुंजवणी प्रकल्पातील पर्यायी तांत्रिकदृष्ट्या व खर्चिकदृष्ट्या आणि सिंचनासाठी योग्य ठरणारी सुधारीत योजना सूचविली आहे. माझी प्रस्तावित योजना मार्गी लागेपर्यंत सध्या जैसे थे राहुद्या, असे जलसंपदा मंत्र्यांना स्पष्ट केले. हे विमानतळाच्या प्रवेशव्दाराचे सांगतायत.. मग 120 मिमी पाईपने पाणी कसे शेतात येणार ते सांगा की? 

(संपादन : सागर डी. शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Sanjay Jagtap criticizes former minister Vijay Shivtare