ट्रक अडवून लूटमार करणाऱ्या टोळीवर मोका

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

ट्रक अडवून लूटमार करणाऱ्या आंतरराज्य टोळीविरुद्ध मोकाच्या प्रस्तावास विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. मनोजकुमार लोहिया यांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी आज दिली. 

बारामती (पुणे) : ट्रक अडवून लूटमार करणाऱ्या आंतरराज्य टोळीविरुद्ध मोकाच्या प्रस्तावास विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. मनोजकुमार लोहिया यांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी आज 
दिली. 

पुण्यात लर्निंग लायसन्स टेस्ट आता सकाळी साडेसात पासूनच 

कल्याणसिंग सदुलसिंग चौहान, सतीश अंतरसिंह झांझा, मनोज केसरसिंग गुडेन (रा. ओढ, ता. सोनकच, जिय देवास), ओमप्रकाश कृष्णा झाला व मनोज ऊर्फ गंगाराम राजाराम सिसोदिया (रा. भैरवखेडी, ता. टोकखुर्द, जि. देवास), दिनेश वासुदेव झाला व सुशील राजेंद्र झाला (रा. टोककला, ता. टोकखुर्द, जि. देवास) यांच्यावर मोकाअंतर्गत कारवाई झाली आहे. महाराष्ट्रातील यवत, शिक्रापूर, शनिशिंगणापूर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत, कर्नाटकमध्ये ब्याडगी, हुबळी, उत्तर प्रदेशात खोराबार, पश्चिम बंगालमधील सागरदिघी आणि ओरिसा व हरियाना राज्यात देखील या टोळीने औषधे व सिगारेटचे ट्रक लुटले आहेत. महाराष्ट्रात त्यांच्याविरुद्ध आठ गुन्हे दाखल होते. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रांजणगाव येथून आयटीसी कंपनीच्या सिगारेटचे तब्बल ४ कोटी ६१ लाख ८८ हजार रुपये किमतीचे बॉक्स २४ जून २०२० रोजी ट्रकमधून कर्नाटकमधील हुबळी येथे नेण्यात येत होता. त्यावेळी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोरगाव- नीरा रस्त्यावर १३ अनोळखी लोकांनी या ट्रकवर दरोडा टाकून सर्व माल लुटून नेला होता. त्यानंतर वडगावचे सहायक पोलिस निरिक्षक सोमनाथ लांडे, गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरिक्षक पद्माकर घनवट, गणेश कवितके, विठ्ठल कदम, भाऊसाहेब मारकड, अमोल भुजबळ व त्यांच्या पथकाने या टोळीला शिताफीने अटक केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 औषधे किंवा सिगारेटचा ट्रक अडवून चालकाला मारहाण करून त्या ट्रकमधील माल दुसऱ्या वाहनातून पळवून न्यायचा, अशी या टोळीची कार्यपद्धती आहे. या टोळीकडून होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचे स्वरूप लक्षात घेता या टोळीविरुद्ध मोकाअंतर्गत कारवाई प्रस्तावित केली होती. त्याला पोलिस महानिरिक्षकांनी मान्यता दिली आहे. 

बारामती उपविभागाची दमदार कामगिरी 
कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये बारामती पोलिस उपविभागाने गेल्या दोन वर्षात १६ टोळ्यांमधील १२२ गुन्हेगारांविरुद्ध मोकाची कारवाई केली आहे. ही कामगिरी परिक्षेत्रामध्ये विक्रमी आहे. या १२२ गुन्हेगारांपैकी १०९ जण गजाआड असून, उर्वरित फरारी आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mock the truck's looters