

पत्रकार परिषदेतील मोदींच्या कृतीवरून वादंग
नॉर्वेतील पत्रकार आक्रमक; राहुल यांचीही मोदींवर टीका
ओस्लो/नवी दिल्ली, ता. १९ (वृत्तसंस्था) : नॉर्वे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार स्टोर यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर उपस्थित पत्रकारांपैकी एका महिला पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी निघून गेल्याने वादंग निर्माण झाला आहे. या प्रकरणावरून नॉर्वेच्या पत्रकार हेला लेंग यांना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी प्रत्युत्तर दिले असून, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
नॉर्वेत एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांना महिला पत्रकाराने काही प्रश्न घेण्याची विनंती केली. मात्र, पंतप्रधान तेथून सभागृहाबाहेर निघून गेले. त्यानंतर ‘‘भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही, आणि मला तशी अपेक्षाही नव्हती. जागतिक पत्रकार स्वातंत्र्य निर्देशांकात नॉर्वे पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत १५७ व्या क्रमांकावर असून पॅलेस्टाईन, संयुक्त अरब अमिराती व क्युबा यांच्याशी स्पर्धा करत आहे. ज्या देशांसोबत आपण सहकार्य करतो, त्यांना प्रश्न विचारणे हे आपले कर्तव्य आहे,’’ अशी पोस्ट आणि नरेंद्र मोदींचा व्हिडिओ नॉर्वेच्या पत्रकार हेला लेंग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शेअर केला. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या.
परराष्ट्र मंत्रालयाचे उत्तर
पत्रकार हेला लेंग यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडे देशात ‘मानवाधिकारांचे उल्लंघन’ होत असल्याचा आरोप करून प्रश्न विचारला. त्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर देताना भारताला महान देश आणि प्राचीन संस्कृती असलेला देश असे म्हटले आहे. कोरोना साथरोगाच्या काळात भारताने अनेक देशांना लस पुरवली. यासह विविध प्रसंगात केलेल्या मदतीमुळे संपूर्ण जग भारतावर विश्वास ठेवते, असे उत्तर प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिले.
राहुल गांधी यांची टीका
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नॉर्वेच्या पत्रकाराचा व्हिडिओ ‘रिपोस्ट’ केला आहे. ‘‘जेव्हा लपवण्यासारखे काहीच नसते, तेव्हा भीती बाळगण्यासारखेही काही नसते. जेव्हा जग एका तडजोड केलेल्या पंतप्रधानांना घाबरलेले आणि काही प्रश्नांपासून पळ काढताना पाहते, तेव्हा भारताच्या प्रतिमेचे काय होते,’’ असा सवाल राहुल यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.