

भिलडी (गुजरात), ता. ३० (पीटीआय) : ‘‘माझ्या आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत मी देशातील जनतेची सेवा करत राहीन,’’ अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिली. गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील भिलडी येथे भारत गोवंश प्रजनन आणि संशोधन केंद्राचे (बीबीबीआरसी) उद्घाटन केल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी सुमारे १४ हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. तसेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्तादेखील वितरित केला.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या या विधानाची चर्चा होत आहे. ‘‘देशासमोर संकट उभे राहिले असताना विरोधकांना आनंद होत आहे. खते आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या उपलब्धतेबाबत अफवा पसरवून जनतेमध्ये भीती निर्माण केली जात आहे,’’ असा आरोपही पंतप्रधान मोदी यांनी केला. शेतकरी, तरुण आणि महिला विकसित भारताच्या उभारणीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, देशाची प्रगती काही लोकांना सहन होत नाही, अशी टीका मोदी यांनी केली.
‘शेतकऱ्यांवर ताण नाही’
पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देश खत आणि इंधनाच्या उपलब्धतेबाबत आवश्यक उपाययोजना करत असताना विरोधकांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरविल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘‘खतांचा तुटवडा निर्माण होणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांमध्ये भीती पसरविण्यात आली. शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण तयार करण्यात आले,’’ असा आरोपही त्यांनी केला. जागतिक बाजारपेठेत खतांच्या किमती वाढल्या असल्या तरी त्याचा अतिरिक्त भार सरकारने शेतकऱ्यांवर पडू दिलेला नाही, असेही मोदी यांनी सांगितले. ‘‘जागतिक बाजारात युरियाच्या एका गोणीची किंमत तीन हजार रुपयांपर्यंत असताना भारतीय शेतकऱ्यांना ती ३०० रुपयांपेक्षा कमी दरात मिळत आहे. तसेच डीएपी खताची जागतिक किंमत पाच हजार रुपयांवर गेली असताना शेतकऱ्यांना ते एक हजार ३५० रुपयांना उपलब्ध करून दिले जात आहे,’’ असेही
मोदी यांनी नमूद केले.
‘किसान सन्मान’च्या हफ्त्याचे वितरण
गेल्या काही वर्षांत विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ५० लाख कोटी रुपयांहून अधिक लाभ मिळाला किंवा त्यांची बचत झाली असल्याचा दावा मोदी यांनी केला. किसान सन्मान निधीच्या २४ व्या हप्त्यापोटी सुमारे १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांत १८ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेच्या प्रारंभापासून आतापर्यंत छोट्या शेतकऱ्यांना सुमारे साडेचार लाख कोटी रुपये थेट देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.