ब्रिटिश हिंदूंची निष्ठा त्यांच्या कर्मभूमीशी - भागवत

ब्रिटिश हिंदूंची निष्ठा त्यांच्या कर्मभूमीशी - भागवत
Published on

ब्रिटिश हिंदूंची ब्रिटन हीच
कर्मभूमी : मोहन भागवत

हिंदुत्व कर्मभूमीशी प्रतारणा करण्यास सांगत नाही

लंडन, ता. ६ (पीटीआय) : ‘‘जी आपली कर्मभूमी असते तिथेच आपली निष्ठा वाहिलेली असावी, हे तत्त्व हिंदुत्व संकल्पना पाळते. त्यानुसार ब्रिटिश हिंदूंची निष्ठा ब्रिटनलाच समर्पित आहे,’’ असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी व्यक्त केले. हिंदुत्व कधीही कर्मभूमीशी प्रतारणा करण्यास सांगत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लंडनमध्ये ‘हिंदू स्वयंसेवक संघा’तर्फे (यूके) आयोजित ‘एकात्मतेचा उत्सव’ (सेलिब्रेशन ऑफ वननेस) या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शेकडो ब्रिटिश भारतीय उपस्थित होते. त्यात विविध समाजगटांचे नेते, विद्यार्थी अन् स्वयंसेवक उपस्थित होते. यावेळी भागवत यांनी उपस्थितांनी आधीच विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.

भागवत आपल्या तीन देशांच्या दौऱ्यादरम्यान सध्या ब्रिटनमध्ये आहेत. येथे आयोजित एका मुख्य कार्यक्रमात त्यांना ‘हिंदुत्व’ या शब्दाशी संबंधित गैरसमज दूर करण्यासाठी त्याची व्याख्या सांगण्याची विनंती करण्यात आली. ‘जन्मभूमी’ आणि ‘कर्मभूमी’दरम्यान हिंदू समाजाच्या निष्ठा विभागल्या जाण्याच्या भीतीबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना भागवत म्हणाले, ‘‘खरे तर यात कोणतेही दुमत असण्याचे कारण नाही. जर ब्रिटिश हिंदू हे खरे हिंदू असतील तर ब्रिटन आणि भारताच्या हितसंबंधांत कधीही संघर्ष होणार नाही. तशी परिस्थिती जर उद्‍भवलीच ब्रिटिश हिंदू ब्रिटनचीच बाजू घेतील हे उघड आहे. एखादा अपवाद असू शकतो. परंतु हिंदुत्वाच्या दृष्टिकोनानुसार कर्मभूमीलाच आपल्या निष्ठा वाहिलेल्या हव्यात. तुमचे मूळ किंवा जिथे तुमचा जन्म झाला; त्या जन्मभूमीने दिलेल्या मूल्यानुसार तुम्ही तुमच्या कर्मभूमीत राहता अन् तिची सेवा करता.’’

‘विविधतेचा स्वीकार अन् आदर’

‘‘हिंदू’ हा शब्द कोणत्याही विशिष्ट धार्मिक आचरणाच्या किंवा जीवनशैलीच्या आधारे समजू शकत नाही. ‘हिंदू’ हा एक स्वभाव आहे. ज्या समाजाचा हा स्वभाव आहे तो सर्व प्रकारच्या विविधतेचा स्वीकार आणि आदर करतो. कारण ज्याप्रमाणे पृथ्वीवर पडणारे पाणी अखेर सागरास मिळते त्याप्रमाणे सर्व मार्ग एकाच ध्येयाकडे नेतात अन् विविधतेत एकता सामावली असल्याचे हिंदू समाज मानतो,’’ असेही भागवत यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेला हा आंतरराष्ट्रीय दौरा संपवून भागवत सोमवारी भारतात परतणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com