

MOH26B03298
मोहोळ : कांद्याला दर नसल्यामुळे ‘जनहित’तर्फे मोहोळ शहरात मोफत कांदा वाटप आंदोलन करण्यात आले.
दर पडल्याने मोफत वाटला कांदा
मोहोळमध्ये जनहित शेतकरी संघटनेचे आंदोलन; सरसकट कर्जमाफीचीही मागणी
सकाळ वृत्तसेवा
मोहोळ, ता. ११ : कांद्याला प्रतिक्विंटल चार हजार रुपये दर द्या, अन्यथा राज्याच्या कृषी मंत्र्यांना घेराव घालून जाब विचारू. सरकारने दोन लाखांची केलेली कर्जमाफी सरसकट शेतकऱ्यांसाठी जाहीर करावी, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा देत मोहोळ शहरात जनहित शेतकरी संघटनेने कांद्याला दर नसल्याच्या निषेधार्थ संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता. १०) नागरिकांना ‘मोफत कांदा वाटप’ आंदोलन करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यात सध्या कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर शासनाचे नियंत्रण नसल्याने व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. कांद्याच्या दरात मंदी असतानाही कांद्याचा दर पाडून फक्त पाचशे रुपये दिले जात आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी रडकुंडीला आला आहे. त्यामुळे जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शासनाचा निषेध व्यक्त करून शेतकऱ्यांना सोबत घेऊन अनेक कुटुंबांना मोफत कांदा वाटप करण्यात आले.
देशमुख म्हणाले, केंद्र व राज्य सरकार सातत्याने बोलताना म्हणते की हे सरकार शेतकरीहिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. परंतु हे सरकार शेतकऱ्यांना वाचवण्याचे नव्हे, तर आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखे निर्णय घेत आहे. एकीकडे दोन लाखांची कर्जमाफी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगला निर्णय घेतला; परंतु आमची शेतकऱ्यांच्या वतीने मागणी आहे की राज्यातील शेतकऱ्यांवर सरसकट प्रेम करा. दोन लाखांची कर्जमाफी केली असली, तरी शेतकऱ्याचे दोन लाख तीस हजार कर्ज असो अथवा आठ लाख कर्ज असो, सरसकट दोन लाखांची कर्जमाफी जाहीर करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरील प्रेम मुख्यमंत्री फडणवीस यांनी दाखवून द्यावे, अशी मागणी देशमुख यांनी लावून धरली आहे.
एकरी खर्च करून उत्पादित केलेला कांदा बाजारात नेला, तर त्याचे भाडेही निघत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. येत्या आठ दिवसांत प्रतिक्विंटल कांद्याला चार हजार रुपये दर जाहीर करावा, अन्यथा राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांना घेराव घालून जाब विचारू, असा इशारा देशमुख यांनी दिला.
यावेळी जनहित युवा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नाना मोरे, गणेश चवरे, गोवर्धन घोलप, शिवाजी जाधव, सतीश भुसे, सिद्धू सुर्वे, कोळेगावचे माजी सरपंच नामदेव केवळे, पिंटू पवार, दाजी गाढवे, शाहूराजे गायकवाड आदी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.