महापालिका शाळेच्या ३२ हजार विद्यार्थ्यांच्या खात्यात स्वेटरचे पैसे जमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

कोरोनाच्या काळात दोन वर्ष शैक्षणिक साहित्याचे पैसे दिले जात नसतानाही केवळ नियमावर बोट ठेवून महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वेटरपासून वंचित ठेवले होते.

Pune Municipal Schools : महापालिका शाळेच्या ३२ हजार विद्यार्थ्यांच्या खात्यात स्वेटरचे पैसे जमा

पुणे - कोरोनाच्या काळात दोन वर्ष शैक्षणिक साहित्याचे पैसे दिले जात नसतानाही केवळ नियमावर बोट ठेवून महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वेटरपासून वंचित ठेवले होते. हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर प्रशासनाने तातडीने ८६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर दोन आठवड्यात शिक्षण विभागाने इयत्ता दुसरी, चौथी, सहावी आणि आठवीच्या ३२ हजार विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात स्वेटरचे पैसे जमा केले आहेत. आता पालकांनी मुलांना लवकर स्वेटर घेऊन द्यावेत यासाठी पाठपुरावा सुरू झाला आहे.

पुणे महापालिकेच्या शाळेत गरीब घरातील विद्यार्थी शिकतात. त्यांना शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाते. यामध्ये वह्या, पुस्तक, गणवेश, बूट, स्वेटर, दप्तर यासह इतर वस्तूंसाठी निश्‍चीत केलेली रक्कम थेट विद्यार्थी किंवा पालकांच्या थेट बँक खात्यात (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर -डीबीटी) रक्कम जमा केली जाते.

कोरोनामुळे दोन वर्ष शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा निधी डीबीटी करण्यात आलेला नव्हता. यंदा शाळा सुरू झाल्याने प्रशासनाने पैसे वर्ग करण्यास सुरवात केली. इयत्ता १ली ते ८वी पर्यंत ८९ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या इयत्तेनुसार १५०० रुपयांपासून ते ४५०० रुपयांपर्यंतची रक्कम बँक खात्यात जमा केली. महापालिकेच्या धोरणानुसार विद्यार्थ्यांना एक वर्षा आड स्वेटरचे पैसे दिले जातात. कोरोनात दोन वर्ष पैसे दिले नाहीत हे लक्षात न घेता केवळ ५० टक्के म्हणजे १ ली, ३ री, ५ वी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांना स्वेटरसाठी २६० ते २८० रुपये जमा केले. पण इयत्ता २ री, ४ थी, ६ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांना पैसे दिले गेले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना भर थंडीत स्वेटर शिवाय शाळा गाठावी लागत होती.

‘सकाळ’ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी महापालिका आयुक्तांना हा प्रकार निदर्शनास आणून देऊन ८६ लाखाचा निधी उपलब्ध करून घेतला. त्यानंतर शिक्षण विभागाला हे पैसे लगेच विद्यार्थ्यांच्या बँकेत जमा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या आठवड्यात ३२ हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत.

‘इयत्ता दुसरी, चौथी, सहावी आणि आठवीच्या ३२ हजार विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात स्वेटरचे पैसे जमा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना स्वेटर घेऊन द्यावे व त्याची पावती शाळेत जमा करावी अशा सूचनाही दिल्या आहेत. पुढील आठवड्यात सर्व विद्यार्थ्यांनी स्वेटर घेणे अपेक्षीत आहे.’

- मीनाक्षी राऊत, शिक्षण अधिकारी